गुजरात : गुजरातची राजधानी गांधीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका ज्येष्ठ महिला डॉक्टरला तीन महिन्यांसाठी डिजिटल पद्धतीने 'अटक' करून तिच्याकडून १९ कोटी रुपये उकळण्यात आले. आरोपीने महिलेला सतत धमकावून ही रक्कम ३५ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केली. या हायटेक फसवणुकीत सुरतमधील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्या खात्यात १ कोटी रुपये जमा झाल्याचे आढळून आले आहे.
प्रत्यक्षात, हा गुन्हा १६ जुलै रोजी सायबर सेल सीआयडी क्राईममध्ये नोंदवण्यात आला होता. पीडीत महिलेला १५ मार्च रोजी एक फोन आला . त्या फोनच्या माध्यमातून तिला सांगण्यात आलं की तिच्या फोनमध्ये आक्षेपार्ह मजकूर आढळला आहे. त्यामुळे तिचा फोन बंद करण्यात येणार असल्याचं सांगितलं. तसेच तिच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्याची धमकी संबंधित फोनवरून देण्यात आली. महिला डॉक्टरला सतत धमक्या दिल्या जात होत्या. फोन कॉलमध्ये, आरोपीने सायबर पोलिस, सरकारी वकील आणि इतर सरकारी अधिकारी असल्याचे भासवत महिलेला सांगितले की तिच्या फोनवरून आक्षेपार्ह मजकूर पाठवला जात आहे आणि तिच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने महिलेच्या सर्व मालमत्ता, बँक तपशील आणि अगदी दागिन्यांवर कर्ज घेऊन पैसे ट्रान्सफर केले. महिला इतकी घाबरली होती की जेव्हा जेव्हा ती घराबाहेर पडायची तेव्हा ती तिच्या प्रत्येक हालचाली व्हिडिओ कॉलद्वारे कळवत असे. या टोळीचे कंबोडियासारख्या परदेशी नेटवर्कशी संबंध असल्याचा संशय आहे.
सध्या, ज्या खात्यात जास्तीत जास्त रक्कम ट्रान्सफर करण्यात आली होती त्या खात्याच्या मालकाला सुरतमधून अटक करण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय सायबर ठग टोळीतील इतर सदस्यांपर्यंत पोहोचता यावे म्हणून पोलिस त्याची चौकशी करत आहेत.