संतोष वायंगणकर
कोकणातील रायगड जिल्ह्यात आजही आदिवासी मोठ्या प्रमाणावर आहेत. रायगड जिल्ह्यातील आदिवासी पाड्याचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनस्तरावर जसे प्रयत्न होत असतात त्याप्रमाणेच आदिवासींच्या विकासासाठी सामाजिक स्तरावरही काम होत असतं. वर्षानुवर्षे आदिवासी लोक रानावनात कष्ट करून जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वसामान्यांपेक्षाही आदिवासींचा जीवनसंघर्ष फारच वेगळ्या पातळीवरचा आहे. ज्यांना आजच्या दिवसाचीच भ्रांत आहे, त्यांना त्यांच्या आयुष्यातील उद्या कसा उजाडेल याबद्दल काहीच कल्पना नसते. आदिवासीचं जगणं हे अशाचं स्वरूपातच आहे. रानावनात शेतात काबाडकष्ट करायचे आणि जगण्याची धडपड करायची हेच त्यांच जीवन असत. सामान्यत: जगातील कोणत्याही बदलापासून घडणाऱ्या घडामोडींपर्यंत सर्वच बाबतीत आदिवासी नेहमीच चार हात नव्हे, तर कोसो मैल दूरच असतात. त्यामुळे अशा या आदिवासींच्या आयुष्यात प्रकाशवाटा बनून काही सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. शासकीय स्तरावर ज्या आदिवासींसाठी योजना राबवल्या जातात, त्या योजनांची माहिती पुरवण्याचे काम या संस्था करतात. आदिवासी कातकरी समाजसेवा संस्थेने पुढाकार घेऊन, शासनाच्या आदिवासी एकात्मिक विकास योजनांतर्गत आदिवासी जोडप्यांचा विवाहसमारंभ पार पाडला. एक-दोन नव्हे तर तब्बल एक हजार आदिवासी जोडपी विवाहबंधनात अडकली. अत्यंत साधेपणाने हा विवाह सोहळा पार पडला. खरंतर लाखो रुपयांची विवाह समारंभांवर उधळण करणाऱ्या समाजासमोर हा विवाह सोहळा आदर्श ठरणारा आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यातील एक हजार जोडप्यांचा विवाह करण्यात आला. यासाठी संस्थेचे पदाधिकारी, आदिवासी विकास विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी भरपूर मेहनत घेतली आहे. या अशा उपक्रमातून आदिवासी समाजाला समाजातील मुख्यप्रवाहात आणण्याचा हा सकारात्मक प्रयत्न आहे. कोकणातील या आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र व राज्यसरकारच्या अनेक योजना आहेत. या योजना केवळ शासनाच्या कागदांवरच न राहता, काबाडकष्ट करणाऱ्या आणि खऱ्याअर्थाने मागास असलेल्या आदिवासी घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आदिवासी समाजातील तरुणांच्या शिक्षणाची व्यवस्था करत त्यांनाही शासकीय योजनांचा लाभार्थी बनवल पाहिजे. यामुळेच रायगड जिल्ह्यात हा एक हजार आदिवासींचा विवाह सोहळा निश्चितच सर्व समाज घटकांना आदर्शवत वाटतो.
मिरकरवाडा बंदर वयात येतय...!
कोकणच्या किनारपट्टीवरील बंदरे आता कुठे चर्चेत येऊ लागली आहेत. गेल्या सात महिन्यात खऱ्याअर्थाने कोकणातील या बंदरांच्या विकासाचा विचार अधिक गतिमान होऊ लागला आहे. वाढवण हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे बंदर कोकणात उभे राहत आहे. परंतु त्याचबरोबर कोकणातील अन्य किनारपट्टीवरीलही बंदरांचा विकास होत आहे. त्यामुळे कोकणातील तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा बंदर असंच एक व्यावसायिक स्तरावरचे मोठं बंदर आहे. १९७८ साली जेटी बांधायला घेतली. २०१३ सालीही या बंदराच्या जेटीचा दुसरा टप्पा सुरू होणार होता; परंतु मिरकरवाडा बंदराचा विकास हा गाळात रूतला गेला.
मिरकरवाडा बंदरातील गाळही गेली काही वर्षे काढण्यात येत होता. मात्र, मिरकरवाडा बंदरावर काही वर्षांपासून अनधिकृत झोपड्या, अनधिकृत बांधकाम उभी राहिली. रत्नागिरीतील मिरकरवाड्याच हे बंदर खरंतर झोपडपट्टी आणि अनधिकृत बांधकामांमध्ये गुदमरून गेलं होतं. हे अनधिकृत बांधकामाचे अतिक्रमण प्रशासनाची डोकेदुखी बनली होती; परंतु मिरकरवाडा बंदर यातून मोकळा श्वास घेऊच शकत नाही, असंच रत्नागिरीकरांना वाटल होतं; परंतु महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या बंदरे विकास मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रातील ७२० कि.मी. च्या किनारपट्टीचा पूर्ण अभ्यास करत, अॅक्शन प्लॅन तयार केला. कोकणच्या किनाऱ्यावरील बंदरे कशापद्धतीने विकसित करता येतील याचे अचूक नियोजन त्यांनी केले. २७ जानेवारी २०२५ रोजी मिरकरवाडा बंदराला अनधिकृत बांधकाम आणि झोपड्यांपासून मुक्त केले. हे असं होणं शक्यच नाही असं म्हणणाऱ्या आणि वाटणाऱ्या रत्नागिरीकरांना आश्चर्याचा सुखद धक्का मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिला. रविवार, २७ जुलै रोजी या मिरकरवाडा बंदर विकासाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ झाला. रत्नागिरीतील व्यावसायिक स्वरूपाचे हे फार मोठे बंदर आहे. मिरकरवाडा बंदर विकासाने केवळ रत्नागिरी शहराच्या विकासाला गती मिळणार आहे असे नव्हे, तर कोकणच्या किनारपट्टीवरील महत्त्वाच्या असणाऱ्या या बंदरामुळे व्यापार उद्योगालाही गती मिळणार आहे. ही कोकणच्या विकासाच्या दृष्टीने फार मोठी बाब आहे.
जाता-जाता...
कोकणात आता खऱ्याअर्थाने श्रावण महिन्यातील सण उत्सवांना प्रारंभ होत आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस गणेशोत्सव आहे; परंतु कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे या सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊसधारा सुरू आहेत. कोकणात जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात पाऊस पडणे यात विशेष काही नाही. या पावसाळी हंगामात पाऊस पडत असतोच; परंतु हवामान खात्याचे यावर्षीच्या हंगामात रेड आणि ऑरेंज अलर्ट सतत आहेत. कोकणात इतक्या मोठ्याप्रमाणावर पडणाऱ्या पावसाच करायचं काय ? हा प्रश्न कधीच कोकणातील कुणालाच पडत नाही. कोकणात हा अविश्रांतपणे पडणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या नियोजनाचा विचार होण्याची आवश्यकता आहे. पाऊस पडतोय पाणी नदी, नाल्यांमार्फत थेट समुद्राला जाऊन मिळतंय त्याचा कोकणवासीयांना काही लाभ घेता येत नाही. मार्च, एप्रिल, मे महिन्यात पाणी टंचाई निर्माण होईल का ? याची चिंता सर्वांनाच असते. यामुळे चोहीकडे असणाऱ्या या पाण्याचं नियोजन केल्यास कोकणच्या विकासाला अधिक बळकटी येईल.
कोकणातील आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था कार्यरत आहेत. त्यातील एका संस्थेने एक हजार आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाहसोहळा अत्यंत साध्या पद्धतीने पार पाडून लोकांसमोर आदर्श निर्माण केला. तसेच कोकणातील बंदरांच्या विकासकामांना मंत्री नितेश राणे यांच्यामुळे गतिमानता मिळाली आहे, तसेच कोकणातील पाऊस व त्यामुळे वाढणारी चिंता याचा धांडोळा या लेखात घेण्यात आला आहे.