इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील चिंचलेखैरे येथील खैरेवाडीतील आदिवासी नागरिकांना पावसाळ्यात दरवर्षी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या वाडीला पक्का रस्ता नसल्यामुळे, शहराकडे येण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पावसाळ्यात ओहळातून व चिखलातून जीवघेणी वाट काढावी लागते.
आदिवासींच्या जीवनमानाचा स्तर उंचावण्यासाठी आणि शिक्षणाने त्यांच्या आयुष्यात क्रांती घडवण्यासाठी शासनाच्या अनेक योजना असल्या तरी, त्यांची अंमलबजावणी पाहिजे त्या प्रमाणात होताना दिसत नाही. कोट्यवधी रुपयांच्या विकासाचा ढिंढोरा पिटणारे लोकप्रतिनिधी आदिवासी नागरिकांच्या या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी येथील चिमुकले शाळकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा शिक्षणासाठी हा जीवघेणा प्रवास सुरूच आहे. रस्ता नसल्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना ओहोळातून आणि चिखलातून मार्ग काढावा लागतो. तसेच, ग्रामस्थांना शहरात येण्यासाठी चार नदीपात्र पार करावी लागतात. ही परिस्थिती इगतपुरी-त्र्यंबक तालुक्याच्या विकासाच्या दाव्यांची पोलखोल करणारी आहे. काही दिवसांपूर्वी याच नदीपात्रातून एका आजारी महिलेला डोलीतून उपचारासाठी नेतानाचा एक हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल झाला होता, तरीही शासन यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी अजूनही ढिम्म असल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दोन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी त्यांच्या पथकासह या वाडीला भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी रस्ता बनवण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते.
मात्र, अजूनही या वाडीला रस्ता मिळालेला नाही, त्यामुळे पावसाळ्यात येथील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना चिखल तुडवत पायपीट करावी लागत आहे. लोकप्रतिनिधींनी देखील या वाडीला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे साधे कष्टही घेतलेले नाहीत. दोन वर्षांपूर्वी रस्ता मंजूर असल्याचे सांगितले जात असले तरी, काम कधी सुरू होणार याची प्रतीक्षा येथील आदिवासी बांधवांना आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके झाली असली तरी, अजूनही आदिवासींना त्यांच्या मूलभूत गरजांचे स्वातंत्र्य मिळालेले नाही. रस्त्यांअभावी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत, तर वैद्यकीय उपचार वेळेवर मिळत नसल्याने अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागते. त्यामुळे, या आदिवासींच्या नशिबी आलेले हे दुःख कधी दूर होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.