मँचेस्टर: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात आलेला चौथा कसोटी सामना अनिर्णीत ठरला. शेवटच्या बॉलपर्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात उभारलेला ६६९ धावांचा विशाल स्कोर आणि भारतावरील ३११ धावांच्या आघाडीमुळे शुभमन सेनेवर पराभवाचे ढग घोंघावत होते. दरम्यान, भारतीय संघाने दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी केली.
शुभमन गिलच्या १०३ धावा, रवींद्र जडेजाच्या नाबाद १०७ आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद १०१ धावांच्या जोरावर भारताने इंग्लंडला पाचव्या दिवशी थकवले. भारताने दुसऱ्या डावात ४ बाद ४२५ धावा केल्या. सामना संपताच ऋषभ पंतच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळण्याबाबत मोठे अपडेटही दिले.
टाच फ्रॅक्चर झालेली असतानाही ऋषभ पंतची कमाल
सामन्यातील पहिल्या डावात भारताला साडेतीनशेहून अधिक धावांची खेळी करून देण्यात मोलाचा वाटा ठरतो तो ऋषभ पंतचा. चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पंतला फलंदाजीदरम्यान गंभीर दुखापत झाली होती. त्याला मध्येच मैदान सोडावे लागले होते. सुरूवातीच्या रिपोर्ट्समध्ये त्याच्या टाचेला दुखापत झाल्याचे दिसत होते.
पहिल्या दिवशी रिटायर्ड हर्ट झाला तेव्हा त्याने ३७ धावा केल्या होत्या. त्याच्या दुखापतीचे गांभीर्य पाहता तो पुन्हा फलंदाजी करेल असे वाटत नव्हते. मात्र पंतने आपले खेळाप्रतीचे प्रेम दाखवत दुसऱ्या दिवशी दुखापतग्रस्त असतानाही फलंदाजीचा निर्णय घेतला. तो लंगडत मैदानात आला आणि त्याने फलंदाजी केली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याच्या दुखणाऱ्या पायाला निशाणा बनवण्याचे ठरवले मात्र त्याने समजुतीने फलंदाजी केली.
बीसीसीआयची मोठी घोषणा
जसा सामना अनिर्णीत ठरल्याची घोषणा झाली. त्यानतंर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घोषणा केली की ऋषभ पंत इंग्लंडविरुद्ध पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत खेळणार नाही. बीसीसीआयची मेडिकल टीम सातत्याने त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून असणार आहे. पाचव्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये पंतच्या जागी नारायण जगदीशनला सामील करण्यात आले आहे. हा सामना ३१ जुलैपासून लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरू होणार आहे. मालिकेत सध्या इंग्लंड २-१ ने आघाडीवर आहे.