प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ
खूप काळ उलटला. एकदा वर्तमानपत्रांमध्ये एक बातमी वाचल्याचे आठवतेय की केंद्र सरकारने एक अधिसूचना जारी करून अस्वल, बिबट्या, सिंह, माकडे, वाघ यांसारख्या प्राण्यांना प्रदर्शनीय प्राणी म्हणून वापरण्यास किंवा प्रशिक्षित करण्यास मनाई केली. थोडासा शोध घेतला तेव्हा लक्षात आले की, ते साल १९९८ होते. त्याआधी अनेक वर्षे आई-बाबांबरोबर आम्ही बहिणी सर्कस बघायला जायचो तेव्हा हे सगळे प्राणी सर्कसमध्ये असायचे, तर मुद्दा असा आहे की, सर्कसमध्ये प्राण्यांवर अन्याय केला जातो त्यामुळे सर्कशीत हे प्राणी असता कामा नयेत, हा विचार खरोखरी महत्त्वाचा आहे. मला सगळ्या देशांविषयी माहीत नाही; परंतु भारतात सर्कसमध्ये प्राण्यांच्या वापरावर बंदी आहे.
लहान-मोठ्या माणसांना आनंद देणाऱ्या या सर्कसमधील प्राणीबंदीचा अभ्यास केला तेव्हा कळले की, या बंदीमागे प्राण्यांच्या कल्याणाबद्दलची वाढती ‘जागरूकता’ आणि ‘सार्वजनिक सहानुभूती’ ही मुख्य कारणे आहेत. सर्कसमध्ये प्राण्यांना मनोरंजनासाठी वापरणे क्रूर मानले जाते, कारण त्यांना नैसर्गिक अधिवासातून दूर करून पिंजऱ्यात ठेवले जाते आणि त्यांना अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत, खूपदा त्यांच्या मनाविरुद्ध खेळ करून दाखवण्यास त्यांना भाग पाडले जाते. त्यांना पिंजऱ्यातून आणि बंद गाड्यांमधून दूरदूरचा प्रवास करवतात.
आता अचानक असा नियम झाल्यामुळे सर्कशीत काम करणाऱ्या प्राण्यांचे काय करायचे, असा विचार सर्कस मालकांच्या मनात आला तेव्हा त्यांना परत नैसर्गिक अधिवासात म्हणजे जंगलात नेऊन सोडायचा आदेश सरकारकडून दिला गेला. सर्कसच्या मालकांनी आपले प्राणी जंगलामध्ये सोडले. अनेक वर्षांनंतर झगमगाटी दुनियेपासून दूर या नैसर्गिक अधिवासात आले. लोकांच्या टाळ्या ऐकून जोशपूर्ण कसरती करणाऱ्या या प्राण्यांना रोज रात्री आयते शिजवून दिलेले मटण व त्यांना लागणारे तत्सम पदार्थ खाण्याची सवय होती. त्यामुळे शिकार करणे ते विसरूनच गेले होते. त्यांच्या शरीरात त्या प्रकारची चपळाई राहिलेली नव्हती आणि शिकार करण्याची कलासुद्धा बुद्धी विसरून गेली होती. त्या जंगलात काही शिकारी कुत्रे होते. बऱ्याच दिवसांपासून ते उपाशी होते. त्यांना वाघ, सिंह चक्क एकाच जागी शांतपणे बसलेले दिसले. शिवाय थोडे अशक्त आहेत, हे जाणवले. तसेही शिकारी कुत्रे भुकेले होते आणि त्यांनी विचार केला की यांच्यावर हमला तर करूया. खायला मिळालं तर जगू नाहीतर तसेही उपासमारीने आपण मरूनच जाणार आहोत. या कुत्र्यांनी वाघ-सिंहांवर हमले केले आणि व्यवस्थित त्यांना मारून टाकून आपली भूक भागवली. सर्कशीतल्या प्राण्यांना अशा तऱ्हेने जंगली कुत्र्यांनी खाल्ल्याची बातमीसुद्धा वर्तमानपत्रातून वाचायला मिळाली.
जे प्राण्यांच्या बाबतीत तेच माणसांच्याही बाबतीत होत असेल, असा विचार माझ्या मनात आला कारण माणसाला ‘मनुष्यप्राणी’ म्हटले जाते आणि माणसाचे पूर्वज शेवटी माकडच होते ना!
अलीकडे अनेक कुटुंबाच्या बाबतीत आपण वर्तमानपत्रात बातम्या वाचतो की, आई-वडील अत्यंत प्रतिष्ठित, पैसेवाले; परंतु त्यांची मुले मात्र बिघडलेली! हयातभर आई-वडिलांनी जे कष्टाने कमावले ते काही दिवसांमध्ये मुले सहज उडवून टाकतात. आपल्या मुलांना स्वतः कष्ट करून कमवायची जर सवय आपण लावलेली नसेल तर आपल्या माघारी आपली मुले, आपली संपत्ती सांभाळण्यासाठी फार कष्ट घेताना दिसत नाहीत. उलट ती संपत्ती कशी उधळायची याकडे त्यांचा कटाक्ष असतो, असे अनेकांचे अनुभव आहे. पैसा हाताशी असला की ही मुले व्यसनाधीन होऊ शकतात. अनेक प्रकारच्या व्यसनातून पैशाला पाय फुटतात. कष्टाने पैसे मिळवणे, त्याला वाढवणे, सांभाळणे या गोष्टींकडे त्यांचे दुर्लक्ष होते कारण त्यांना त्याविषयीची माहिती दिलेली नसते आणि तशी सवयही नसते. हळूहळू संपत्ती लयाला जाते अशी उदाहरणे आपण नुसतेच नाटक - सिनेमातून पाहत नाही तर ती वास्तवातही घडताना दिसतात.
जर हे वन्य प्राणी नैसर्गिक अधिवासातच वाढले असते तर साध्या शिकारी कुत्र्यांची शिकार झाली नसती. उलटपक्षी त्यांनीच या कुत्र्यांची सहज शिकार केली असती! म्हणूनच आपण जेव्हा संपत्ती जमवतो, वाढवतो, आपल्या मुलांसाठी राखून ठेवतो तेव्हा त्यांना स्वतः कमावण्याची, कमवलेल्या पैशातून गुंतवणुकीची आणि ती कोणत्या प्रकारे कशी वाढेल याची सवय लावण्याची गरज आहे. आपण त्यांना शिक्षण देतोच! त्यांच्यावर आपल्या वागण्या-बोलण्यातून संस्कार घडत असतात; परंतु त्यांना जाणीवपूर्वक काही गोष्टींची शिस्त लावण्याची तितकीच गरज आहे. ही शिस्त फक्त आर्थिक व्यवहाराची नसून शारीरिक व्यवहाराची, मानसिक व्यवहाराची आणि त्याचबरोबर भावनिक व्यवहाराची सुद्धा महत्त्वाची आहे.
आपल्या माघारी आपल्या मुलांची सर्कसमधील प्राण्यांची जी दुर्दशा झाली तशी होता कामा नये, याची काळजी घेणे, हे शेवटी आपलेच कर्तव्य नव्हे का?