नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड
जवळ जवळ चाळीस वर्षे मी शाळेत नोकरी केली, पण आईचा गुरुमंत्र ध्यानी ठेवून. “जशा तुझ्या प्राजक्ता, निशिगंधा तशीच तुझी शाळेतली सारी मुले! त्यांना आईच्या मायेने वागवं.” आईचे ते शब्द ध्यानीमनी रुजले. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांवर मी मनापासून प्रेम केले. त्यांचीच होऊन राहिली. नवल गोदरेज हे कंपनीचे श्रीमान मालक ! पण ते शाळेत येत असत. खिडक्या तपासत असत. एकदा मी त्यांना धीर करून विचारले. “एक विचारू का सर?” “हो विचार की काहीही विचार.”
“आपण खिडक्या का तपासता?”
“असं बघ मुली, माझी छोटी-छोटी बाळं, त्यांना काचा लागू नयेत (उदयाचलात सर्व खिडक्या, दारे, काचेची असत.) म्हणून तपासतो बरं. अगं, कामगारांची मुलं नि माझी लेकरं यात मी फरक करीत नाही. खूप प्रेम करतो मी सर्वांवर.” हा मजसाठी गुरुमंत्र होता. मी पण खूपच प्रेम केलं लेकरांवर-विद्यार्थ्यांवर तनमनाने ! नि:स्वार्थपणे.
आमच्या शाळेत एक रागीट शिक्षिका होती. आता मुलाखत घेताना आपण विषयाचे ज्ञान तपासतो. खरं ना? ते तिला उत्तम होते. पण स्वभाव? बेधडक ! एकदा एका मुलाला रागाने इतक्या जोरात चापट दिली गालावर की त्याचे एक गालाचे दोन गाल झाले. टुम्म फुगले तोंड.
तो धावत उठला नि सरळ घरी गेला. त्याचे वडील कामगार होते. गोदरेज कंपनीची विक्रोळीतील शाळा ! जिथे मी नोकरी करीत होते. त्यावेळेस मी मराठी विभागाची प्रमुख होते. पर्यवेक्षक होते.
“वीज, काही पालक दारापाशी आले आहेत. बघतेस का?” हेडसरांचा इंटरकॉम आला. मी धावत गेटपाशी गेले. बापरे ! दोनशे पालक?
“एवढं मारायचं?” पालकांनी दोन गाल झालेल्या मुलाला पुढे केलं. सारी कहाणी कथन केली आणि ती टीचर?
तिला पत्ता लागला, तशी ‘वर’ बाथरूमध्ये लपून बसली. “आता ती लपून बसली आहे. पार घाबरली आहे. तुमचा राग मी समजू शकते. तुम्ही मला मारा. कारण मी माझ्या माध्यमाची शिक्षिका आहे. मी सहन करेन तुमचा मार !”
सारे पालक बघतच राहिले. मग मुकाट परतले. वाचली ती ! खरंच तिचे सुदैव ! मीही वाचलेच ना !
तिला, डॉ. पंड्या यांनी चांगली समज दिली.
“पुन्हा विद्यार्थ्यांच्या अंगाला हात लावशील तर याद राख!” “पण पंधराच दिवसांत तिची एक विद्यार्थिनी चक्कर येऊन पडली.
“आता काय पुन्हा?” मी वर्गावर गेले.
“तुम्हाला सांगितलं होतं ना? पट्टी हातात घ्यायची नाही म्हणून? मग उठाबशांची शिक्षा का दिली तिला?”
“किती उठाबशा काढायला सांगितल्या?”
“पाचशे!”
“पाचशे?”
“चल, डॉ. पंड्यांकडे चल.”
“मी सगळा गैरप्रकार डॉ. पंड्यांना कथन केला.
“यू, इमिजिएटली रिझाईन” त्यांनी त्या शिक्षिकेला फर्मावले. तिला हे अपेक्षितच नव्हते. ती त्यांच्या पाया पडली. मी तिला जवळ घेतली.
“इतका कसला राग? कुठून येतो तो? तुझ्या बाळाला सांगितल्या असत्यास का इतक्या उठाबशा काढायला?”
ती गप्प, चुप्प !
“रिझाईन अँड गो अवे.” पंड्यासरांनी फर्मान काढले.
“मी कधीही कुणालाही अशी शिक्षा करणार नाही मोठे सर ! मला एकवेळ माफ करा.’’
“आधी उठाबशा काढ !”
“मी?”
“हो. तू. तूच !”
“मित्रांनो, पालक विश्वासाने त्यांच्या जीवाचा कलिजा शिक्षकांच्या हाती सोपवतात, हे कायम लक्षात असू द्या. ठेवाल ना ध्यानी?