मँचेस्टर: मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलने इतिहास रचला. भारताचा युवा कर्णधार शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांचा ८६ वर्षांचा विक्रम मोडीत काढला. गिलने आपल्या शतकी खेळीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
ओल्ड ट्रॅफर्डवर सुरू असलेल्या या कसोटीच्या अंतिम दिवशी शुभमन गिलने २२९ चेंडूंमध्ये १२ चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. या शतकासह, त्याने या मालिकेतील आपले चौथे शतक पूर्ण केले. एका कसोटी मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत तो सुनील गावस्कर (१९७१, १९७८) आणि विराट कोहली (२०१४-१५) नंतर तिसरा भारतीय ठरला आहे.
या शतकी खेळीमुळे, शुभमन गिलने इंग्लंडमध्ये एका कसोटी मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करण्याचा डॉन ब्रॅडमन यांचा ८६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. ब्रॅडमन यांनी १९३८ च्या ऍशेस मालिकेत हा विक्रम केला होता.
या मालिकेत शुभमन गिलने आतापर्यंत ७०० हून अधिक धावा केल्या आहेत. तो एका कसोटी मालिकेत ७०० हून अधिक धावा करणारा तिसरा भारतीय फलंदाज बनला आहे. यापूर्वी सुनील गावस्कर (वेस्ट इंडिजविरुद्ध १९७१ मध्ये ७७४ धावा) आणि यशस्वी जैस्वाल (२०२४ मध्ये ७१२ धावा) यांनी हा पराक्रम केला होता.
शिवाय, आपल्या पहिल्याच कसोटी मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत तो केवळ सर डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, १९३६/३७ मध्ये ८१० धावा) यांच्या मागे आहे.
मँचेस्टर कसोटीत भारताच्या दुसऱ्या डावात पहिल्याच षटकात दोन विकेट गमावल्यानंतर शुभमन गिल फलंदाजीला आला. त्याने केएल राहुलसोबत १८० हून अधिक धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून संघाला संकटातून बाहेर काढले. त्याच्या या शानदार शतकामुळे भारताचा डाव २०० धावांच्या पुढे गेला आणि संघाने सामन्यात पुनरागमन केले.