शरद कदम
मिळून मिसळून राहणारी साधी भोळी माणसं, मनिऑर्डरवर अवलंबून असणारी, कितीही गरीब असला तरी घरात आलेल्या माणसाला चटणी आणि तांदळाची भाकरी खावू घालून त्याचं आदरातिथ्य करणारी असं वर्णन कोकणातील माणसांचं केलं जातं. मग तो माणूस गावी राहणारा असला किंवा पुण्या- मुंबईत राहणारा असला किंवा अगदी सातासमुद्रापार लंडनमध्ये राहत असला तरी त्याच्या वागणुकीत तसूभरही फरक पडत नाही.
चिपळूण शहरातला बहादुरशेख नाका ओलांडला की ‘वशिष्ठी नदी’ लागते. तिथंच पुढे कळंबस्ते, धामणंद रस्त्यावरील दहा किलोमीटरवर असलेल्या ‘आंबडस’ या गावातील सचिन दत्तात्रय कदम आज इंग्लंडमध्ये आपल्या व्यवसायाची पताका डौलाने फडकवताना दिसत आहेत. लंडनमधील माझा मित्र संतोष पारकर, माझा जावई तन्मय पेडणेकर यांच्यासोबत आज त्यांची वॉटफोर्ड या शहरात जाऊन भेट घेतली आणि लंडनमध्ये कोकणी पाहुणचाराचा अनुभव घेतला.
दोन दिवसांपूर्वी सचिन कदम यांच्याशी फोनवर बोलत होतो. त्यांच्याशी गप्पा मारताना ते म्हणाले, माझा जन्म, शिक्षण जरी पुण्यात झालं असलं तरी मी चिपळूण जवळच्या ‘आंबडस’ गावातला आहे. माझे रूट्स अजून कोकणातील मातीशी आहेत. तेव्हा मीही बाजूच्या ‘भेलसई’ गावातला असून माझा मावसभाऊ अजय कदम याचे आंबडस येथे घर आहे आणि मी तिथं अनेक वेळा राहिलो आहे. हे सांगताच ते म्हणाले, ते घर तर माझ्या घराच्या बाजूलाच आहे. आम्ही दोघेही खूप उत्सुक झालो. लंडनमध्ये गाववाला भेटल्याचा आनंद काय वर्णावा. आपण लवकरात लवकर भेटूया असं ‘आवतान’ त्यांनी फोनवर दिले.
टॉवर ब्रिजपासून दोन ट्रेन बदलत दीड तासांचा प्रवास करीत, वॉटफोर्ड रेल्वे स्टेशनजवळ संतोष पारकर आमची वाट बघत उभा होता. मग त्याला जॉईन होऊन त्यांच्या गाडीतून दहा मिनिटांचा प्रवास करीत संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास सचिन कदम यांच्या घरी पोहोचलो. इंग्लंडमध्ये जशी टुमदार घरं, रस्ते असतात तसेच वॉटफोर्डमधलं त्याचं घर आहे.घराच्या मागच्या बाजूला असलेल्या ‘Conservatory’मध्ये आम्ही गप्पा मारत बसलो. जवळजवळ तासभर आम्ही कोकण, चिपळूण परिसर, गावचा शिमगा, त्याचं शिक्षण, सुरुवातीचा संघर्ष आणि यातून फळांच्या जीवावर उभे राहिलेले साम्राज्य हा सारा पट त्यांनी गप्पा मारताना उलगडून दाखविला. खरं म्हणजे आम्ही नुसतं त्यांना भेटायला गेलो होतो, पण त्यांची यशोगाथा ऐकल्यावर हे सारं महाराष्ट्रातील विशेषत: कोकणातील लोकांना कळलं पाहिजे म्हणून त्यांच्या परवानगीने सारं लिहून काढलं.
पुण्यातल्या डेक्कन जवळच्या गरवारे हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. B.M.C.C. बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे येथे त्यांनी ग्रॅज्युएशन केले. पुढे सिंबायोसिसमध्ये आयटी विषयात मास्टर केले. पहिली नोकरी १९९७ मध्ये कुवेतमध्ये केली. तिथं ३ वर्षं नोकरी केल्यानंतर ते २००० मध्ये इंग्लंडमध्ये आले. लंडन शहरात असलेल्या स्वीस कॉटेज, बेकर स्ट्रीट येथे नोकरी केली. कुवैतमध्ये नोकरी करत असताना अपर्णा पाटील यांच्याशी त्याचं लग्न झालं. अपर्णा या इचलकरंजी, कोल्हापूरच्या. आज त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा ध्रुव आयर्लंडमधील ‘डब्लिन’ शहरात नोकरी करतो. तो आयर्लंडचा राष्ट्रीय युवा सचिव असून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही सक्रिय आहे. लहान दर्श इथेच शिक्षण घेत आहे.
उद्योगाची, व्यवसायाची कोणतीच पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून सचिन आले आहेत. आज त्यांनी उभारलेल्या व्यवसायात तसे ते अपघातानेच आले आहेत. झालं असं की, त्यांच्या यूकेमधील नोकरीच्या सुरुवातीच्या काळात त्यांची अमेरिकेत राहणाऱ्या विनय सावंत यांची अपघाताने गाठ पडली.विनय हे सुट्टीत इंग्लंड फिरायला आपल्या मुलीसोबत आले होते. विनय यांचे मुळगाव लांजा, रत्नागिरी. ते बेकर स्ट्रीट येथील सचिन यांच्या घरी काही दिवस राहिले असताना आपण आंब्यांचा व्यवसाय इथं करू शकतो का याची चाचपणी केली. मी लांज्याहून आंबे पाठवून देईन असे त्यांनी सांगितले. विनय सावंत यांनी सुचवलेली ही कल्पना सचिन यांना खूपच आवडली. इंग्लंडमध्ये अनेक देशांतून आंबे येतात पण कोकणातील आंब्यांची चव कोणत्याही आंब्यात नाही हे त्यांना माहीत होते. मग विनय यांच्या मदतीने त्यांनी २००७ मध्ये नोकरी सांभाळून आंबे विकायला सुरुवात केली. पहिल्याच वर्षी सगळे आंबे विकले गेल्याने आणि काही ‘पौंड’ फायदा झाल्याने त्यांचा हुरूप वाढला. सलग तीन वर्षे त्यांनी कोकणातून आंबा आणून इंग्लंडमध्ये विकून दाखवला, पण आंब्यांचा सीझन अवघा दोन ते अडीच महिन्यांचा असल्यामुळे वर्षभर चालणारा व्यवसाय केला पाहिजे असं त्यांच्या मनात आलं. अशातच त्यांची पुण्यातील विकास दांगट यांच्याशी भेट झाली. दांगट हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर गावचे. २०११ - १२ मध्ये त्यांनी सचिन यांना भाजी आणि इतर वस्तू विकण्यासाठी प्रोत्साहन दिले.
लंडनमधील सुरुवातीचा संघर्षाचा काळ होता. नवीन देश, नवी नोकरी, लहान मुलगा, पत्नीची जबाबदारी होती. सुरुवातीला नोकरी सांभाळूनच विकास यांच्या ईट वेल कंपनीच्या रेडी टू ईट उत्पादनाचे मार्केटिंग सुरू केले. स्वतःची अर्ध्य नावाची कंपनी सुरू केली. आयात केलेल्या अन्न पदार्थावरील निर्बंध, त्यावरचे कडक नियम समजून घेतले. आफ्रिकन देशाला भेटी देणे, तिथून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंची नीट माहिती घेणे. जर्मनी, नेदरलँड्स आदी देशांमध्ये जाऊन अन्न आणि फळ प्रदर्शनात भाग घेणे. विक्रीची प्रोसेस समजून घेण्यासाठी इंग्लंडमधील वेगवेगळ्या शहरातील दुकानांत जावून त्यांनी मार्केटिंगचे काम केले आहे. या सगळ्या कामात आर्थिक बाब महत्त्वाची असते. या आर्थिक नियोजनाच्या कामात पत्नी अपर्णाची साथ मिळाली.
२०१५ मध्ये त्यांनी आफ्रिकेतील घाना, केनिया, युगांडा आदी देशांतून भाजी, फळे आणायला सुरुवात केली. २०१७ मधून नवी मुंबईतील वाशी मार्केटमधून इंग्लंडमध्ये भाजी, फळे आणून त्यांनी विक्री सुरू केली. आजमितीला भारतासह जगातील अन्य दहा देशांतून भाजी, फळे, नारळ, इतर वस्तू ते आणतात. संपूर्ण यूके, आयर्लंड, नेदरलँड, कॅनडा आणि युरोपमध्ये त्यांचा भाजी आणि फळांचा व्यवसाय पसरला आहे. सुरुवातीला त्यांनी लंडन शहरात आंबा महोत्सव भरवून ब्रिटिशांना आंब्याची चव चाखायला लावली. आज केवळ आफ्रिका किंवा युरोप नाही तर भारतातून अनेक प्रकारच्या भाज्या, फळे आणून त्याची ते विक्री करतात.
५० टन भाजी विक्री, तर आंब्याच्या सीझनला चाळीस हजार डझन आंबे विक्री करतात. नव्वद प्रकारच्या भाज्या त्यांच्या कंपन्यांमार्फत विकल्या जातात. कोट्यवधी रुपयांचा त्यांचा टर्नओव्हर आहे. कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना काही काळ आयटी क्षेत्रातील नोकरी करून केवळ मेहनतीच्या जोरावर प्रसंगी वितरण, उत्पादन, आलेल्या भाज्या, फळे उतरवून घेण्यापर्यंतची सर्व कामे त्यांनी केली आहेत. पत्नी अपर्णा यांना उद्योग अनुभव प्रतिष्ठान, ठाणे यांच्याकडून ‘उद्योग दीप्ती एन आर आय पुरस्कार’ मिळालेला आहे, तर सचिन यांना कोकण भूमी प्रतिष्ठानचा ‘कोकण आयडॉल’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कोकणातील एक चाकरमानी इथं लंडनमध्ये राहून पंचवीस वर्षांत आपलं एक साम्राज्य उभे करतो. ‘शिमग्याला’ आवर्जून कोकणात गावी जातो. आपल्या साऱ्या यशाचं श्रेय आई-बाबा, सासू-सासरे, भाऊ, बहीण, पत्नी अपर्णा, ध्रुव आणि दर्श या मुलांना देतानाच व्यवसायात आणि आयुष्याच्या वाटेवर चालताना आपली जोडीदार अपर्णा यांची साथसोबत आणि फायनान्शियल कंट्रोलमुळेच मी उभा राहू शकलो अशी कबुलीही ते देतात. अशा कोकणी माणसाला सलाम. आता त्यांनी आपल्या अनुभवाचा, संपर्काचा कोकणात, रत्नागिरी जिल्ह्यात धडपड करणाऱ्या तरुण मुलां-मुलींच्या प्रयत्नांना, बचत गटाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करणाऱ्या गावागावांतील बहिणींच्या पाठीशी उभं राहून त्यांना स्वतःचे उद्योग उभे करण्यासाठी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदतीचा हात पुढं करायला पाहिजे एवढीच अपेक्षा आणि इच्छा आहे.