देवगड : श्रावणी सोमवार उत्सवाला २८ जुलैपासून सुरुवात होत आहे. दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या कुणकेश्वर तीर्थक्षेत्री पहिल्याच श्रावण सोमवारी शिवशंभोच्या दर्शनासाठी तसेच नामगजरासाठी भक्तांची पाऊले वळू लागली आहेत. दर्शनासाठी देवस्थान ट्रस्टने नियोजन केले आहे.
यंदा २८ जुलै तसेच ४, ११ आणि १८ ऑगस्ट अशा चार श्रावण सोमवारी हा उत्सव पार पडणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने भक्तांसाठी सुरळीत दर्शन व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, पार्किंग आणि वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक श्रावणी सोमवार निमित्त प्रथम पूजेचा मान प्रतिष्ठित मान्यवरांना देण्यात येतो. यंदा पहिल्या श्रावण सोमवारी पूजेसाठी सुरेश नेरूरकर (प्रसिध्द उद्योजक, मालवण) आणि आनंद शिरवलकर (प्रसिध्द उद्योजक, कुडाळ) यांना हा मान देण्यात आला आहे.
प्रथम पूजेनंतर सकाळी ६ वा.पासून भाविकांसाठी दर्शन रांगांना सुरूवात होणार आहे. राज्य परिवहन मंडळाच्या देवगड आगारामार्फत विशेष बससेवा चालविण्यात येणार असून देवगड कुणकेश्वर तसेच रत्नागिरी, सावंतवाडी, कणकवली येथून थेट बससेवा उपलब्ध राहणार आहे. दर श्रावण सोमवारी सकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत महाराष्ट्रातील नामांकित भजनी मंडळांकडून भजनांचे सादरीरकरण होणार आहे. दर्शन तसेच कार्यक्रमाच्या नियोजनासाठी देवस्थानकडून सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.