उरण : महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेली बोट बुडाली. बोटीत असलेले आठ पैकी पाच मच्छिमार नऊ तास पोहून समुद्र किनाऱ्यावर पोहोचले. इतर तीन मच्छिमार बेपत्ता आहेत. बेपत्ता मच्छिमारांचा शोध सुरू आहे.
पावसाळ्यात समुद्रात मासेमारी करणे टाळतात. राज्य शासनाने समुद्राला उधाण येते म्हणून काही आठवडे सागरी मासेमारीवर बंदी घातली आहे. या बंदीचे उल्लंघन करुन आठ मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊन मासेमारी करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न मच्छिमारांना भोवला. बोट खोल समुद्रात असताना तुफान वारा आला आणि उंचच उंच लाटा उसळू लागल्या. या प्रतिकूल परिस्थितीत बोट टिकाव धरू शकली नाही आणि बुडाली. बोटीत असलेले आठ पैकी पाच मच्छिमार नऊ तास पोहून समुद्र किनाऱ्यावर पोहोचले. इतर तीन मच्छिमार बेपत्ता आहेत.
बोटीत असलेले सर्व मच्छिमार उरण तालुक्यातील आपटा, करंजा आणि हावरे कोळीवाड्यातील आहेत. बोट उरण येथून अलिबागमधील खांदेरीच्या दिशेने जात असताना बुडाली. बोट बुडाल्यावर पोहत किनारा गाठणाऱ्या पाच जणांना मांडवा पोलिसांनी अलिबाग जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले आहे. बेपत्ता असलेल्या ३ मच्छिमारांचा शोध सुरू आहे. तटरक्षक दल, स्थानिक बचाव यंत्रणा आणि ड्रोन यांच्या मदतीने बेपत्ता मच्छिमारांचा शोध सुरू आहे.