लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर
जयाचेनि अंगे समाधान भंगे।
अहंता अकस्मात येऊनी लागे।
तये संगतीची जनी कोण गोडी।
जिये संगतीने मती राम सोडी।।
- समर्थ रामदास-मनाचे श्लोक
मनःशांती ही मानवी जीवनातील सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. ती बाह्य गोष्टींवर नव्हे तर अंतर्गत शांततेवर अवलंबून असते. ही शांती मिळवण्यासाठी सद्वर्तन, सत्संग आणि सदाचार आवश्यक असतो; परंतु जेव्हा आपण चुकीच्या संगतीत जातो, तेव्हा ही मनःशांती ढळते. म्हणूनच ‘कुसंगती’ म्हणजे चुकीची संगत टाळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आपली अशांती, आपले समाधान आपणच ओढवून घेतो. एखाद्या व्यसनी माणसाप्रमाणे आपण वाईट मुलांच्या गटात ओढले जातो आणि स्वतःचे नुकसान करून घेतो. महारथी कर्ण मुळात चांगला होता; परंतु, दुर्योधन, दुशासनानी शकुनीमामा यांच्या सतत सहवासात राहून कर्णाने आपली मनशांती गमावली. युद्धात कर्णाचा वापर करता यावा म्हणून दुर्योधन कर्णाचा अहंकार सतत फुलवत होता. त्यामुळे कर्णाचे नैतिक पतनही झाले. म्हणून आपण ज्याच्या संगतीत राहतो त्यांचे स्वभाव, त्यांची प्रवृत्ती सतत तपासली पाहिजे. आपले नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
एकदा आकाशात उडणाऱ्या एका घारीला जमिनीवर मेलेला मासा पडलेला दिसला. तिने तो आपल्या चोचीत पकडला आणि तिने आकाशात झेप घेतली. आकाशात सात-आठ घारी संचार करीत होत्या. आपल्याला हा मासा मिळावा म्हणून सर्व घारी तिच्या मागे लागल्या. आपल्या चोचीत मासा घट्ट पकडून ती घार उडत होती. बाकीच्या घारी तिचा पाठलाग करीत होत्या आणि ती घार मासा घेऊन वर जात होती. काही घारींनी तिच्या पाठीमागून चोची मारल्या. शेवटी त्या घारीने मासा टाकून दिला; दुसऱ्या घारीने तो मासा पकडला. आता बाकीच्या घारी तिचा पाठलाग करू लागल्या. ही दमलेली घार एका क्षणासाठी थांबली. झाडावरून सारा प्रकार पाहू लागली. तिच्या लक्षात आले की आपल्या चोचीत मासा होता तोपर्यंत आपल्याला शत्रू होते आणि जोपर्यंत शत्रू आहेत तोपर्यंत अशांती आणि असमाधान आहे. कुसंगती म्हणजे काय?
कुसंगती म्हणजे अशा व्यक्तींची संगत जी आपल्याला चुकीच्या मार्गाकडे, वाईट विचारांकडे किंवा वाईट वर्तनाकडे नेते. अशा संगतीत व्यक्तीचा चारित्र्यभंग होतो, चुकीच्या सवयी लागतात, मन अशांत होते आणि आयुष्यात नकारात्मकतेचे
वर्चस्व वाढते.
कुसंगतीचे परिणाम :
१. मनात अस्थिरता: चुकीचे विचार, वाद, द्वेष, हेवेदावे यामुळे मन सतत अस्वस्थ राहते.
२. स्वतःवरील विश्वास कमी होतो : चुकीच्या मार्गाने जाताना अपराधी भावना वाढते.
३. स्वभाव बदलतो : संयम, सहनशीलता, नम्रता यांची जागा राग, हट्ट, उद्धटपणा घेतो.
४. शारीरिक व मानसिक आरोग्य ढासळते.
५. चुकीच्या मार्गाकडे वळण्याची शक्यता वाढते.
उदाहरणे :
१. महाभारतामधील दुर्योधनाचे उदाहरण : दुर्योधनाची संगत शकुनीसारख्या कपटी व्यक्तीशी होती. शकुनीच्या सल्ल्यामुळे त्याने पांडवांविरुद्ध कट रचले, जे शेवटी
विनाशक ठरले.
२. चांगल्या मुलाच्या बिघडण्याचे उदाहरण : अनेकदा पाहायला मिळते की एक उत्तम विद्यार्थी चुकीच्या मित्रांच्या संगतीत गेला की, तो अभ्यास सोडतो, व्यसनांमध्ये गुरफटतो आणि आयुष्य उद्ध्वस्त करतो.
पौराणिक उदाहरण - एकदा गरुडाने एका कबुतराला पकडले. कबुतर राजा शिबीकडे धावले. गरुड म्हणाले, “मी भुकेला आहे, हे कबुतर मला दे” राजा शिबीने कबुतर वाचवून स्वतःचे मांस देण्याचा निर्णय घेतला.इथे गरुड कबुतरासाठी कुसंग होता. तो हिंसक होता. कबुतराने जर थांबून त्याच्याशी संगत ठेवली असती तर ते संपले असते.
सकारात्मक संगतीचे उदाहरण :
संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांसारख्या महात्म्यांच्या संगतीत सामान्य व्यक्तींचे जीवनही शांत, सात्त्विक आणि यशस्वी झाले.
जशी कुसंगतीने मनशांती हरवते. तशीच सुसंगती म्हणजे चांगल्या विचारांचे, प्रेरणादायी, संयमी लोकांचे सहवास हे मनशांती प्रेरणा व आत्मविश्वास देते.
कुसंगतीपासून वाचण्यासाठी उपाय :
१. सद्विचारांनी मन बळकट करा.
२. चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा (सत्संग).
३. स्वतःचे मूल्य ओळखा - आत्मचिंतन करा.
४. ध्यान, वाचन, सकारात्मक सवयी अंगीकारा.
५. समस्या आल्या तरी चुकीच्या मार्गाकडे वळू नका.
जीवनात महत्त्वाकांक्षा असावी. डोळ्यांसमोर उच्च ध्येय असावे; परंतु त्यासाठी प्रयत्नवाद, निष्ठा, प्रार्थना याची कास धरावी. कुसंगती ही सुरुवातीला गोड वाटते, पण नंतर तिचे परिणाम फार भयंकर असतात. म्हणूनच आपण कुणासोबत वेळ घालवतो, त्यांचा आपल्यावर काय परिणाम होतो, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. योग्य संगत हीच खरी संपत्ती आहे आणि तीच मनःशांतीकडे घेऊन जाते.
“सत्संगतीचे फळ अमूल्य, कुसंगतीचे फळ धोकादायक!”