Sunday, December 28, 2025

महिलेने या कारणामुळे सोडली तब्बल इतक्या लाखांची पगाराची नोकरी...

महिलेने या कारणामुळे सोडली तब्बल इतक्या लाखांची पगाराची नोकरी...

मुंबई : कॉर्पोरेट क्षेत्रातील ताणतणाव आणि मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांमुळे अनेकजण त्रस्त झाले आहेत. ब्रिटनमधील एका महिलेने आपल्या आरोग्यावर होणाऱ्या या परिणामांमुळे चक्क उच्च पगाराच्या नोकरीवर पाणी सोडलं आहे. ब्रिटनमधील ५६ वर्षीय शानी हेगन यांनी आपल्या उच्च पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून दिली आहे. मानसिक शांतता आणि आरोग्याला प्राधान्य देत त्यांनी कारखान्यातील कमी पगाराची नोकरी स्वीकारली आहे.

एकेकाळी बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून वर्षाला ५७ लाख रुपये (सुमारे ६६,००० डॉलर्स) कमावणाऱ्या शानी हेगन यांना कॉर्पोरेट जगतातील दोन दशकांच्या कार्यकाळानंतर तीव्र मानसिक आणि शारीरिक ताणाचा सामना करावा लागला. कामाच्या ताणामुळे त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ लागला. यामुळे त्यांनी आपल्या जीवनात बदल करण्याचे ठरवले.

मोठ्या पगाराची नोकरी सोडून शानी यांनी एका कारखान्यात काम करायला सुरुवात केली आहे, जिथे त्यांना वर्षाला केवळ २७ लाख रुपये (सुमारे ३२,२५० डॉलर्स) मिळतात. पगारात मोठी कपात झाली असली तरी, शानी त्यांच्या या नवीन भूमिकेत खूप आनंदी आणि समाधानी आहेत. त्यांचे नवीन काम खाद्यपदार्थ पॅक करणे, उत्पादनांना लेबल लावणे, कम्प्युटर व्यवस्थापन आणि साफसफाई करणे असे आहे.

शानी यांच्या म्हणण्यानुसार, या बदलामुळे त्या अधिक शारीरिक दृष्ट्या सक्रिय झाल्या आहेत, त्यांचे वजन कमी झाले आहे आणि त्यांच्या मानसिक आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली आहे. आता त्यांना पूर्वीच्या नोकरीमुळे येणारी 'रविवारची संध्याकाळची भीती' वाटत नाही. त्यांना त्यांच्या छंदासाठी, म्हणजेच चित्रकलेसाठी जास्तीत जास्त वेळ मिळत आहे.

शानी हेगन यांचा विश्वास आहे की कितीही पैसा असला तरी त्या पैशाने वेळ आणि आरोग्य परत मिळवता येत नाही. मानसिक थकव्यापेक्षा काटकसर करणे त्यांना अधिक पसंत आहे. सध्या त्या जीवनातील सर्वात आनंदी दिवस अनुभवत आहेत आणि त्यांच्या या निर्णयाबद्दल इतरांच्या मतांची त्यांना अजिबात चिंता नाही.

Comments
Add Comment