जतन करावा असा कबड्डीचा ठेवा...

  43

अशोक बोभाटे 


ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विनायक दळवी लिखित कबड्डीतील किमयागार या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले.


अनेक ऑलम्पिक तसेच विश्वचषक क्रिकेट स्पर्धांच्या वार्तांकनाचा ढिगबर अनुभव. धावपटू युसेन बोल्ट, जलतरणपटू मायकेल फेल्प्स यांचा विश्वविक्रमही याचि देही याचि डोळा पाहिला. तरीही कबड्डी खेळाविषयीची आपुलकी तसूभरही कमी झाली नाही. त्यामुळेच या पुस्तकाचं लेखन आपल्याकडून होऊ शकले असे विनायक दळवी सांगतात. शरद पवार त्यांचे कौतुक करतात तेही याचसाठी. शरद पवार यांची या पुस्तकाला मिळालेली प्रस्तावना या सर्वांची साक्ष देते.


कबड्डीच्या प्रचार-प्रसारासाठी पवार यांनी केलेल्या प्रयत्नांचा आढावा ‘पोशिंदा’ या पहिल्याच लेखात घेताना त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली जाते. पहिल्या आवृत्तीमध्ये राहिलेल्या उणिवेची दुसऱ्या आवृत्तीमध्ये भरपाई केली गेली आहे. शरद पवार यांनी कबड्डीच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा सांगोपांग आढावा ‘आध्य किमयागार’ या पहिल्याच लेखात आढळतो. क्रिकेटसह सर्वच खेळाच्या खेळाडूंना हस्ते परहस्ते शरद पवार यांनी केलेल्या मदतीचा आढावा घेताना त्यांचे क्रीडा क्षेत्रावर असलेले उपकार कधीही न विसरता येण्याजोगे अशा शब्दांत लेखक आपली भावना व्यक्त करतो.


पुस्तकाचे मुखपृष्ठ खूप छान पद्धतीने सजविले आहे. कबड्डी महर्षी शंकरराव ऊर्फ बुवा साळवी, माजी क्रीडा संपादक आत्माराम मोरे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह विविध कबड्डीपटूंची छायाचित्रे मुखपृष्ठाचे आकर्षण ठरतात. सुमारे २३२ पानांच्या या संग्रहात सर्वांची वर्णने अतिशय आटोपशीर असल्याने या सर्वांविषयीची उत्सुकता आणखीनच वाढते. पुस्तकाची मांडणीही अगदी आटोपशीर. मुद्रण टाईपही बऱ्यापैकी मोठा असल्यामुळे पुस्तक वाचताना डोळ्यांना त्रास जाणवत नाही. खरं तर अगदी ज्येष्ठ खेळाडू कार्यकर्ते यांच्यापासून अगदी नव्याने कबड्डीचे धडे गिरवत असलेल्या सर्वांनाच खूप आनंद देईल असा हा संग्रह आहे. ज्यांच्याविषयी आपण कधीकाळी फक्त ऐकले होते त्या धुरंदर, बलशाली, चतुर खेळाडूंची चरित्रे प्रत्यक्षपणे वाचण्याचा आणि संग्रही बाळगण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण भूमिका या पुस्तकाने बजावली असं म्हणता येईल. प्रत्येक खेळाडू-कार्यकर्ते यांच्या फोटोंसह भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे महाराष्ट्राच्या महिला कबड्डी संघासोबतचे छायाचित्र लक्ष वेधून घेते. मलपृष्ठावरील प्रत्यक्षपणे सामन्याच्या छायाचित्राने आणि खेळाडूच्या दर्शनाने पुस्तक परिपूर्णतेकडे जात असल्याचं जाणवत. मुखपृष्ठाच्या आतील पानावर पहिल्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा आपणास ३८ वर्षांपूर्वी झालेल्या सोहळ्याची आठवण करून देतो. २५ ऑक्टोबर १९८८ रोजी पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन झाले होते.


खेळाडूंचा परिचय करून देताना अपेक्षेप्रमाणेच मधु पाटील यांना पहिल्या पंक्तीत बसवले आहे. शारीरिकदृष्ट्या फारशी उंची नाही, शरीरसौष्ठव सुद्धा जेमतेम; परंतु अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या मधु पाटील यांनी देशभरातील सर्व मैदाने गाजविली आणि प्रतिस्पर्धी संघाना सळो की पळो करून सोडले याचा मस्तपैकी आढावा घेताना त्यांना ‘शहेनशहा’ ही अतिशय सार्थ अशी उपमा दिलेली आपणास दिसेल. अतिशय अनुरूप असं सर्वच खेळाडूंचं वर्णन करताना लेखकाने चालविलेल्या लेखणीला अलंकार, अनुप्रास, स्तुतिसुमनं या सगळ्याच गुणांनी शृंगारिक केल्याचं जाणवतं. सुमारे ऐंशीपेक्षा जास्त कबड्डीपटूंचा भरणा असलेल्या या संग्रहात सदानंद शेट्ये, विजू पेणकर, राजाराम पवार, सभा भाले, बाबाजी जामसंडेकर, विजय जाधव, सुनील जाधव, वसंत सूद, श्रीराम भावसार, गणेश शेट्टी, दत्ता मालप, सीताराम (मंच्या)शिंदे, भाई काळुष्टे आणि त्यांचे बंधू, अशोक कोंढरे, शांताराम जाधव, शांताराम वाघे, सीताराम साळुंखे, वसंत ढवण, दलाजी राणे, खिमबहादूर ऊर्फ केटी थापा, कुमार कुळकर्णी, शेखर शेट्टी, जया शेट्टी, तारक राऊळ, राजाराम शिंदे, राणाप्रताप तिवारी या आणि अशा पुरुष खेळाडूंसोबतच चित्रा आणि क्रांती, छाया बांदोडकर, वासंती सातव, ज्वाला मयेकर, उल्का लेले, शैला रायकर, ग्रेटा डिसोझा, शकुंतला खटावकर, मोहिनी चाफेकर, माया आक्रे, दाते भगिनी, मनीषा कोंढाळकर या दर्जेदार, रणरागिणी महिला खेळाडूंनाही मानाचं पान देऊन पुस्तक खूपच वाचनीय केले आहे.


शरद पवार यांच्यासोबतच, कबड्डीची पताका अटकेपार जावी यासाठी अष्टोप्रहर मेहनत घेतलेले कै. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी यांच्या कार्याचा गौरव ‘निष्ठावंत पाईक’ या लेखात उठून दिसतो, तर कबड्डीसह सर्वच देशी खेळांसाठी अखेरपर्यंत आपली लेखणी झिजविणारे आणि लेखकाला गुरुस्थानी असणाऱ्या कै. आत्माराम मोरे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली नसती तरच नवल. मैदानावरील कार्यकर्त्यांमध्ये उजवे समजले जाणारे लीलाधर चव्हाण यांचा समावेश म्हणजे खऱ्या अर्थाने, तळमळीने कार्यक्रम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्रातिनिधिक स्वरूप म्हणता येईल. आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे यांनी दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाचा घातलेला घाट केवळ प्रशंसनीय नाही, तर धाडसी म्हणावा लागेल.

Comments
Add Comment

काय साधणार वारसा मानांंकनाने?

आनंद खर्डे महाराष्ट्रासाठी जुलैचा महिना तसा खासच! या महिन्यात बांदल देशमुख आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या

चित्रकारांची पिढी घडविणारा अवलिया

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर थोर परंपरा लाभलेल्या कोकणच्या लाल मातीत राहून इथल्या नाजूक आणि ओल्या मातीला आकार

लंडनच्या मार्केटवर मराठी झेंडा

शरद कदम मिळून मिसळून राहणारी साधी भोळी माणसं, मनिऑर्डरवर अवलंबून असणारी, कितीही गरीब असला तरी घरात आलेल्या

शिक्षकाचे व्यवहार तंत्र

नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड जवळ जवळ चाळीस वर्षे मी शाळेत नोकरी केली, पण आईचा गुरुमंत्र ध्यानी ठेवून. “जशा

सहनशीलता

जीवनगंध : पूनम राणे गुरुपौर्णिमेचा दिवस होता. फुलबाजार तेजीत चालला होता. नेहमी १० रुपयांला मिळणारा गुलाबाचा भाव

मी आई-बाबांच्या रागाचं कारण?

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू आपले आई-वडील बहुधा झोपले असावेत आतापर्यंत असा समज झाल्याने दोन भावंडं