नवी दिल्ली: टीम इंडियाचा स्टार खेळाडू नितीश कुमार रेड्डी हा सध्या दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडला आहे. पण आता त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे, ज्याचा फटका त्याच्या क्रीडा कारकीर्दीवर देखील पडण्याची शक्यता आहे. नितीश विरोधात एका मेनेजमेंट कंपनीने त्यांचे पैसे बुडवल्याचा आरोप केला आहे. ज्याद्वारे त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. याप्रकरणी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
नितीश कुमार रेड्डीवर ५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी न भरल्याचा आरोप आहे. बंगळुरूस्थित टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सी स्क्वेअर द वनने त्याच्यावर हा आरोप केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी वेळी नितीश रेड्डी आणि स्क्वेअर द वन एजन्सी यांच्यात वाद झाला होता. या दोघांमध्ये ३ वर्षांचा करार होता. मात्र वादानंतर रेड्डीने करार तोडत नवीन कंपनीसोबत करार केला. त्यामुळे आता रेड्डी आणि एजन्सीमध्ये मोठा वाद झाला आहे. हे प्रकरण आता कोर्टात गेले आहेत.
करार तोडल्याचा आणि थकबाकी न भरल्याचा आरोप
स्क्वेअर द वन प्रायव्हेट लिमिटेड एजन्सीचे संचालक शिव धवन यांनी नितीश रेड्डीवर करार तोडल्याचा आणि थकबाकी न भरल्याचा आरोप करत कोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी आता सोमवारी (२८ जुलै) दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. स्क्वेअर द वन सोबत करार असताना नितीश रेड्डीने एजन्सीचे मीडिया प्रमोशनही केले होते, मात्र आता तो प्रमोशन करताना दिसत नाही.
नितीश रेड्डीने स्पष्ट केली भूमिका
क्रिकेटर नितीश कुमार रेड्डीने याबाबत आपले मत व्यक्त करत न्यायालयात जाण्यास तयार असल्याचे म्हटलं आहे. रेड्डीने म्हटले की, मी स्वतःच एंडोर्समेंट डील मिळवली होती. यात स्क्वेअर द वन एजन्सीचा सहभाग नव्हता, त्यामुळे मी एजन्सीली कोणतेही पैसे देणार नाही अशी भूमिका रेड्डीने घेतली आहे.
रेड्डी दुखापतीमुळे संघातून बाहेर
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात रेड्डीला संधी मिळाली होती. यात त्याने४५ धावा केल्या आणि तीन विकेट घेतल्या होत्या. मात्र त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे तो संघातून बाहेर पडला आहे. तो आता भारतात परतला आहे.