Sunday, August 24, 2025

त्र्यंबकेश्वर - दर्शन पासचा काळाबाजार करणाऱ्या चौघांना अटक

त्र्यंबकेश्वर - दर्शन पासचा काळाबाजार करणाऱ्या चौघांना अटक

त्र्यंबकेश्वर : देवस्थानच्या वतीने देण्यात येणाऱ्या पासचा काळाबाजार करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर देवस्थानने एक मोफत दर्शन रांग आणि एक देणगी दर्शन रांग असे दोन पर्याय उपलब्ध केले आहेत. या व्यवस्थेचा गैरफायदा घेण्यात येत आहे. मंदिर परिसरात ऑनलाईन दर्शनपास मिळवून त्याचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी कारवाई केली आहे.

या टोळीतील चार जणांना अटक केली आहे. बनावट नाव पत्ता आणि ओळखपत्र तयार करुन ऑनलाईन पास मिळवून भाविकांना प्रतिव्यक्ती ७०० ते एक हजार रुपये दराने विकले जात होते. या संशयितांची झाडाझडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे भ्रमणध्वनी आणि मेल आयडीच्या माध्यमातून हा काळाबाजार होत असल्याचे उघड झाले. या संशयितांविरुध्द त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक केलेल्या कारवाईत दिलीप झोले आणि सुदाम बदादे (रा. पेगलवाडी), समाधान चोथे (रा.रोकडवाडी), शिवराज आहेर (रा. निरंजनी आखाड्याजवळ, त्र्यंबकेश्वर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

भाविकांना त्र्यंबकराजाचे दर्शन सुलभ व्हावे, म्हणून देवस्थानच्या वतीने एक मोफत दर्शन रांग आणि एक देणगी दर्शन रांग अशी व्यवस्था करण्यात आली आहे. देणगी दर्शनासाठी २०० रुपये घेतले जातात. त्यासाठी मंदिर परिसरात दर्शन पास कक्ष तसेच ऑनलाईन दर्शन पास काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, अनेक दिवसांपासून ऑनलाईन दर्शन पासमध्ये काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी सुरु होत्या. त्याविरोधात पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि मंदिराचे पदसिध्द अध्यक्ष अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साळी यांनी गंभीर दखल घेत कडक कारवाई करण्याच्या सूचना त्र्यंबकेश्वर पोलिसांना दिल्या होत्या.

Comments
Add Comment