Saturday, August 2, 2025

Kolhapur: राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

Kolhapur: राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

पावसाचा व वाऱ्याचा जोर वाढल्याने रात्री क्रमांक सहाचा दरवाजा खुला झाला


कोल्हापूर: राधानगरी येथील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरून दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले. यातून २ हजार ८५६ व विज निर्मितीसाठी १ हजार ५०० असे ४ हजार ३५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू झाला आहे. भोगावती व पंचगंगा नदी काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.


जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काल धरणाची पाणीपातळी ९९ टक्क्यांवर पोहोचली होती. पावसाचा जोर कायम राहिल्याने शुक्रवारी रात्री उशिरा दहा वाजता धरणाचा स्वयंचलीत दरवाजा उघडण्यात आला.


सध्या धरणातून विजगृहासाठी १५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरवाजे उघडल्यामुळे विसर्गात मोठी वाढ झाली आहे. धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने आणि विसर्ग वाढीमुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा


पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरणाचेआणखीन दरवाजे कधीही उघडले जाऊ शकतात. पावसाचा जोर आणि धरणातील वाढती पाणीपातळी लक्षात घेता, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुढील काही तासांत धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे.



धरण क्षेत्रांत गेल्या चोवीस तासांत अतिवृष्टी


कालपासून  पावसाच्या जोरदार सरी जिल्ह्यात सर्वत्र कोसळत आहेत. आज सकाळी शहरातही हलक्या सरी पडल्या. काल दिवसभरात अधूनमधून सरी कोसळत राहिल्या. दरम्यान, जिल्ह्यातील धरण क्षेत्रांत गेल्या चोवीस तासांत अतिवृष्टी झाली. यामध्ये कुंभी, घटप्रभा, पाटगाव, कासारी, धामणी, कोदे आदी धरण क्षेत्रांत ६५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडला. यामुळे नद्यांच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे १८ फूट असणारी पंचगंगेची पाणी पातळी २० फूट सहा इंचांवर पोहोचली. अद्याप पंचगंगेवरील राजाराम बंधाऱ्यासह सहा, दूधगंगा नदीवरील एक, वारणा नदीवरील दोन बंधारे पाण्याखाली आहेत.

Comments
Add Comment