बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियम मोठ्या स्पर्धांसाठी असुरक्षित घोषित
बेंगळुरू: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) च्या जेतेपदानंतर, बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली. विजयी मिरवणूक सुरू असतानाच चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. तर ५० हून अधिक लोक जखमी झाले.
चिन्नास्वामी चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती जॉन मायकल डी'कुन्हा यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन करण्यात आला. कर्नाटक मंत्रिमंडळाने या न्यायिक आयोगाच्या अहवालाला नुकतीच मंजुरी दिली. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या मते, न्यायिक आयोगाच्या अहवालात काही धक्कादायक खुलासे झाले आहेत.
अहवालात काय म्हंटले आहे?
अहवालात बेंगळुरूचे एम. चिन्नास्वामी स्टेडियमला मूलभूतपणे असुरक्षित म्हटले आहे. यात म्हटले आहे की चिन्नास्वामी स्टेडियमची सध्याची रचना मोठ्या स्पर्धांसाठी अयोग्य आणि धोकादायक आहे. स्टेडियममध्ये पुरेसे प्रवेश आणि निर्गमन दरवाजे नाहीत. थोडक्यात काय तर स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपत्कालीन निर्वासन योजना तैनात करण्यात आलेल्या नाही. स्टेडियमभोवतीचे रस्ते खूप वर्दळीचे आहेत. तसेच, पार्किंगसाठी देखील मर्यादित जागा आहे.
विश्वचषक आणि आयपीएल सामन्यांबद्दल शंका!
महिला विश्वचषक २०२५ चे किमान ४ सामने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहेत. जर पाकिस्तानी संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला नाही, तर विजेतेपदाचा सामना देखील येथे खेळला जाईल. तसेच, चिन्नास्वामी स्टेडियम पुढील वर्षी आयपीएल (Indian Premier League) आणि डब्ल्यूपीएल (Women Premier League) सामने आयोजित करणार आहे. मात्र,, हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय आणि इतर सामन्यांच्या आयोजनावर एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरण संबंधित आरोपींवर कारवाईचा मार्ग मोकळा
कर्नाटक सरकारने न्यायालयीन आयोगाच्या अहवालाला मान्यता दिल्याने, आरसीबी, केएससीए (Karnataka Cricket Association), डीएनए एंटरटेनमेंट आणि बंगळुरू पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. अहवालानुसार, विजय परेड दरम्यान, मैदानावर फक्त ७९ पोलिस तैनात होते, बाहेर कोणीही नव्हते. रुग्णवाहिका देखील नव्हती आणि घटनेच्या ३० मिनिटांनंतर संयुक्त पोलिस आयुक्त पोहोचले. न्यायालयीन आयोगाने शिफारस केली आहे की मोठे कार्यक्रम केवळ आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानके पूर्ण करणाऱ्या स्टेडियममध्येच आयोजित केले जावेत.