टीम इंडियासाठी 'करो या मरो' ची अवस्था
मँचेस्टर: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा चौथा सामना मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जात आहे. आज (२६ जुलै) या सामन्याचा चौथा दिवस आहे. इंग्लंडचा पहिला डाव ६६९ धावांवर संपला. इंग्लंडकडे ३११ धावांची आघाडी आहे. भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही खूपच खराब झाली आहे. यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन खाते न उघडताच बाद झाले आहेत. मात्र केएल राहुल आणि शुभमन गिलवर आता संघाची मदार आहे.
या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ३५८ धावा केल्या. यजमान इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ ने पुढे आहे. अशा परिस्थितीत, हा सामना टीम इंडियासाठी 'करो या मरो' पेक्षा कमी नाही. जर भारतीय संघाने हा सामना गमावला तर इंग्लंड संघ मालिका जिंकेल. तसेच या पराभवाबरोबरच टीम इंडियाची जी नाचक्की होईल ती वेगळीच!
४२ वर्षांपूर्वीचा लाजिरवाणा कित्ता पुन्हा घडला
सामना सुरु झाल्यावर पहिल्या दोन बॉलमध्येच यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन हे दोघं खातं न खोलता तंबूत परतले. त्यांच्या या कामगिरीने ४२ वर्षांपूर्वीचा कित्ता पुन्हा घडला आहे. १९८३ नंतर पहिल्यांदाच भारताने कसोटी सामन्याच्या एका डावात खाते न उघडता दोन विकेट गमावल्या आहेत. डिसेंबर १९८३ मध्ये चेन्नई येथे वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दोन विकेट एकही धाव न काढता गमावल्या होत्या. पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन यांनी चांगली फलंदाजी केली होती. मात्र दुसऱ्या डावात त्यांना मैदानात टिकूनच दिले नाही.
इंग्लंडचा पहिला डाव धमाकेदार
इंग्लंडच्या पहिल्या डावात बेन डकेट आणि जॅक क्रॉलीने पहिल्या विकेटसाठी १६६ धावांची भागीदारी केली. बेन डकेटने ९४ आणि क्रॉलीने ८४ धावांचे योगदान दिले. त्यानंतर ऑली पोप आणि जो रूट यांनी तिसऱ्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी केली. तर जो रूट आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी देखील केली. या तीन शतकी भागीदारींनी इंग्लंडला मजबूत स्थितीत आणले आहे. १५० धावा काढल्यानंतर रवींद्र जडेजाच्या चेंडूवर जो रूट स्टम्प आउट झाला. स्टोक्सनेही शतक झळकावले. इंग्लंडचा पहिला डाव ६६९ धावांवर संपला.
भारताच्या पहिला डावात सुदर्शन-पंत-यशस्वी यांचे अर्धशतक
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या डावात ३५८ धावा केल्या. टीम इंडियाकडून साई सुदर्शनने सर्वाधिक ६१ धावा केल्या. यशस्वी जयस्वाल (५८ धावा) आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (५४ धावा) यांनीही अर्धशतकी खेळी केली. सलामीवीर केएल राहुल (४६ धावा) आणि शार्दुल ठाकूर (४१ धावा) यांनीही उपयुक्त धावा केल्या. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने पाच बळी घेतले. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला तीन यश मिळाले.