चौथ्या दिवसाचा खेळ संपला, २ विकेट गमावत भारताच्या १७४ धावा, राहुल आणि गिलने सावरले
मँचेस्टर: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमध्ये सुरू आहे. या मालिकेत भारतीय संघ २-१ ने पिछाडीवर आहे. त्यामुळे हा सामना जिंकणं भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे. मात्र, या सामन्यातही भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आहे. सामन्यातील तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना इंग्लंडने ७ गडी बाद ५४४ धावांचा डोंगर भारतासमोर उभा केला. ज्यासह इंग्लंडने १८६ धावांची आघाडी घेतली. त्याला उत्तर म्हणून चौथ्या दिवशी फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाने पहिल्याच षटकात दोन विकेट गमावले. ख्रिस वोक्सच्या पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन बाद होऊन माघारी परतला आहे. मात्र त्यानंतर शुभमन गिल आणि के एल राहुलने टीम इंडियाचा गडबडलेला डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
शुभमन गिल- केएल राहुलची दमदार खेळी
या सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला पहिल्याच षटकात २ मोठे धक्के बसले. यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन शून्यावर माघारी परतले. भारतीय संघाला खातंही उघडता आलं नव्हतं. मात्र, त्यानंतर केएल राहुल आणि शुभमन गिलने मिळून १७४ धावा करत टीम इंडियाची ढासळलेली फलंदाजी सावरली. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी १७४ धावा केल्या आहेत. केएल राहुल ८७ धावांवर नाबाद आहे. तर शुबमन गिल ७८ धावांवर नाबाद आहे. त्यामुळे या दोन्ही फलंदाजांना पाचव्या दिवशी शतक झळकावण्याची संधी असणार आहे. इंग्लंडकडे अजूनही १३७ धावांची आघाडी आहे.