मुंबई : केंद्र सरकारने अश्लील कंटेंट प्रसारित करणाऱ्या २५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर कारवाई केली आहे . यात समोर आलेल्या नावांपैकी एक नाव म्हणजे ALTT, ज्याला पूर्वी ALTBalaji म्हणून ओळखले जात असे.
हा प्लॅटफॉर्म बंद झाल्यानंतर सोशल मीडियावर एकता कपूरला ट्रोल करायला सुरुवाच झाली . अखेर एकता कपूरने शनिवारी एक निवेदन प्रसिद्ध केले आणि सरकारने बंदी घातलेल्या अॅपशी माझा आणि माझ्या आईचा संबंध नाही, असे जाहीर केले.
बालाजी टेलिफिल्म्स कंपनीने एएलटीटी हे अॅप सुरू केले. पण जून २०२१ मध्ये एएलटीटीमधील पदावरुन पायउतार झाले, असे एकता कपूरने सांगितले. बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध असलेली बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड ही एक व्यावसायिकरित्या चालवली जाणारी मीडिया संस्था आहे. एएलटीटी अॅपशी माझा आणि माझ्या आईचा आता थेट संबंध उरलेला नाही; असे एकता कपूरने सांगितले.
केंद्र सरकारने उल्लू, एएलटीटी आणि डेसिफ्लिक्ससह २५ ओटीटी प्लॅटफॉर्मच्या वेबसाइट्स आणि अॅप्सना अश्लील सामग्री असल्याने ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. विविध कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या अॅप्समध्ये एएलटीटी, उल्लू, बिग शॉट्स अॅप, डेसिफ्लिक्स, बूमेक्स, नवरासा लाईट, गुलाब अॅप, कंगन अॅप, बुल अॅप, जलवा अॅप, शोहिट, वॉव एंटरटेनमेंट, लूक एंटरटेनमेंट, हिटप्राइम, फेनेओ, शोएक्स, सोल टॉकीज, अड्डा टीव्ही, हॉटएक्स व्हीआयपी, हलचल अॅप, मूडएक्स, निऑनएक्स व्हीआयपी, फुगी, मोजफ्लिक्स आणि ट्रायफ्लिक्स यांचा समावेश आहे .