
नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. हवामान खात्याने बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि केरलसह अनेक राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा तडाखा
शुक्रवारी मध्य प्रदेशात जोरदार पावसाची नोंद झाली असून सिंगरौली येथे तब्बल ७ इंच पावसाची नोंद झाली आहे. अशोकनगरच्या चंदेरी येथील राजघाट धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आल्याने पुलावरील पाण्याची पातळी ८ फूटांवर गेली आहे. त्यामुळे मध्य प्रदेश-उत्तर प्रदेश जोडणारा मुख्य महामार्ग बंद झाला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

मनमाड : मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालय आधीच रेफर हॉस्पिटल म्हणून प्रसिद्ध होत असतानाच याच हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेली १०८ रुग्णवाहिका तसेच ...
हिमाचलमध्ये आपत्तीजनक परिस्थिती
हिमाचलमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रीय होणार असून, मंडी, शिमला आणि सिरमौरमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एसडीएमए) नुसार, शुक्रवारी संध्याकाळपर्यंत २२१ रस्ते, ३६ वीज ट्रान्सफॉर्मर आणि १५२ पाणीपुरवठा योजना बंद ठेवण्यात आल्या आहेत.
२४ जुलैपर्यंत २५ ढगफुटी, ३० भूस्खलन आणि ४२ पूराच्या घटना घडल्या असून, ४१४ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त, २९७ घरे जमीनदोस्त, तर ८७७ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. राज्यात आतापर्यंत १५३ जणांचा मृत्यू झाला असून १,४३६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद आहे.
पावसाचा इशारा असलेली राज्ये
रेड अलर्ट : मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा
ऑरेंज अलर्ट : बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, तेलंगणाचा काही भाग, कर्नाटक, केरळ, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर
बिहारमध्ये पावसाचा यलो अलर्ट
बिहारमध्ये शनिवारी २५ जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारी अनेक भागांत जोरदार पावसाची नोंद झाली.
राजस्थान : ९ जिल्ह्यांत अलर्ट, जयपूरमध्ये रात्रीपासून पाऊस
राजस्थानातील ९ जिल्ह्यांमध्येही पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. जयपूरमध्ये शुक्रवारी रात्रीपासून पाऊस सुरू आहे.
मध्यप्रदेशमध्ये अतिवृष्टीचा इशारा; अनेक जिल्ह्यांत पूरजन्य परिस्थिती
सायक्लोनिक सर्क्युलेशन, ट्रफ आणि डिप्रेशनमुळे मध्यप्रदेशमध्ये पावसाचे प्रबळ सिस्टीम सक्रीय झाले आहे. राज्यातील ४१ जिल्ह्यांत अतिवृष्टीचा अलर्ट देण्यात आला आहे. भोपाल, ग्वालियर, रायसेन, शिवपुरी, बालाघाट, मंडला इत्यादी जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
ग्वालियरच्या हजीरा भागात जुनी इमारत कोसळली. रामगड नाल्याला पूर आल्याने डबरा भागात पाणी साचले असून, एनडीआरएफची मदत सुरू आहे. रायसेनमधील बारना धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले असून, २२,८०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शिवपुरीमधील अटल सागर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. मंडलामध्ये नर्मदा नदीचा पाणीपातळी वॉर्निंग लेव्हल ओलांडून ४३७.२ मीटरवर पोहोचली आहे. बालाघाटच्या कोटेश्वर मंदिरात पाणी शिरले असून, प्रवेश बंद करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये ५९ जिल्ह्यांत अलर्ट
लखनऊमध्ये शुक्रवारी वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसामुळे साइबर टॉवर इमारतीचा एक भाग कोसळला. ललितपूरमध्ये गोविंद सागर धरणाचे दरवाजे ४ फूट उघडण्यात आले आहेत. राज्यातील ५९ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. जयपूरहून लखनऊला येणारी फ्लाइट व खराब हवामानामुळे परतवण्यात आली. दिल्लीहून लखनऊला येणाऱ्या इंडिगो फ्लाइटला टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला.
झारखंड, छत्तीसगडमध्येही मुसळधार पाऊस
झारखंडमध्ये ३० जुलैपर्यंत पावसासह वीज कोसळण्याचा अलर्ट जारी आहे. सात जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे.
छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील घिनारा नाल्याला पूर आल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. बिलासपूरमध्ये नाल्यात कार वाहून गेल्याची घटना घडली. कारमधील ९ पैकी ८ लोक वाचले, मात्र ३ वर्षांचा बालक वाहून गेला आहे.
पंजाब, हरियाणा आणि केरलमधील स्थिती
पंजाब आणि हरियाणामध्ये बहुतांश भागांत हवामान साफ असून, हरियाणात २७ जुलैनंतर पावसाची शक्यता आहे.
केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात पावसासह वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत.
गेल्या २४ तासांत किनारी कर्नाटक, केरळ आणि विदर्भ भागात पावसाची नोंद झाली आहे. तसेच ओडिशा, झारखंड, मध्य प्रदेश, कोकण आणि गंगेच्या पश्चिम बंगाल क्षेत्रात मध्यम ते जोरदार पाऊस झाला आहे.
नागरिकांसाठी सूचना
हवामान खात्याने नागरिकांना अत्यावश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, तसेच पावसामुळे धोका असलेल्या भागांत सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.