कोकण आपत्ती सौमीकरण योजनेतून ६२१ कोटींचा खर्च
१२६४ किलोमीटर असणार विद्युत वाहिनीची एकूण लांबी
सुभाष म्हात्रे
अलिबाग : रायगड जिल्ह्यात भूमीगत वीज वाहिनीचे जाळे विस्तारीत करण्यात येणार आहे. अलिबागमधील भूमिगत वाहिनीच्या यशस्वी प्रयोगानंतर जिल्ह्यात सर्व्हेचे काम सुरू होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडीत होण्याच्या समस्यांना आळा बसणार आहे.
रायगड जिल्ह्यात वीज पुरवठा खंडित होणे ही दररोजचीच समस्या होऊन बसल्याने यावर उपाय म्हणून रायगड जिल्ह्यात ६२१.६७ कोटी रुपये खर्चून तालुक्याच्या गावांमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. कोकण आपत्ती सौमीकरण योजनेतून रायगड जिल्ह्यात १२६४.२३ किलोमीटर लांबीची भूमिगत विद्युत वाहिनीचे हे काम होणार असून, अलिबागमधील भूमिगत वाहिनीच्या यशस्वी प्रयोगानंतर इतर ठिकाणीही ही योजना राबविण्यासाठी सर्व्हे केला जात आहे.
हा प्रकल्प राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प अंतर्गत राबविला जात आहे. जागतिक बँकेकडून या प्रकल्पासाठी आर्थिकसाह्य मिळत असून, यामध्ये ७५ टक्के जागतिक बँक आणि २५ टक्के केंद्र सरकारचा वाटा असणार आहे. यातील सर्वात जास्त ७१५ किलोमीटरची विद्युत वाहिनी श्रीवर्धन तालुक्यात टाकली जाणार आहे. निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळात श्रीवर्धन तालुक्यात मोठे नुकसान झाले होते.
तब्बल तीन महिने अंधारात राहिलेल्या श्रीवर्धन शहरासह आजुबाजूच्या गावांमध्ये विद्युत वाहिनीचे जाळे विणण्यासाठी तब्बल २८५ कोटी रुपये खर्च केले जातील. त्याचबरोबर पेण, मुरुड, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, महाड, पोलादपूर आणि उरण तालुक्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. खालापूर, कर्जत, सुधागड या तीन तालुक्यांना यातून वगळण्यात आले आहे.
कोकण आपत्ती सौमीकरण योजनेच्या पॅकेज एक मधून अलिबाग आणि आसपासच्या किनारपट्टी भागांमध्ये, भूमिगत विद्युत वाहिनी योजना राबवण्यात आली आहे. अलिबाग-१ आणि अलिबाग-२ अशा दोन टप्प्यात राबविण्यात आलेल्या या योजनेतून १२२.२५ किलोमीटरची विद्युत वाहिनी टाकण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश वादळे आणि नैसर्गिक आपत्त्यांमुळे वारंवार होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या व्यत्ययांवर मात करणे, तसेच विद्युत अपघातांचा धोका कमी करणे आणि शहराचे सौंदर्य वाढविणे हा आहे.
वादळ, अतिवृष्टी, पूर यासारख्या आपत्तींमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवणे, विजेचे खांब पडणे, तारा तुटणे आणि वीज पुरवठा खंडित होणे टाळणे, वीज अपघातांचा धोका कमी करणे, शहरी भागातील विजेच्या तारांचे जाळे जमिनीखाली गेल्याने शहराचे सौंदर्य वाढविणे, वीजचोरी कमी करणे, वीज पुरवठा अधिक सुरक्षित आणि विश्वसनीय करणे या योजनेचे तपशील आहेत.
विद्युत वाहिन्यांची लांबी (कि.मी.मध्ये)
- पेण २३.७३ कि.मी.
- मुरुड ९८.९५ कि.मी.
- रोहा १५.०० कि.मी.
- तळा २२.५० कि.मी.
- माणगाव १२.०० कि.मी.
- म्हसळा २०२ कि.मी.
- श्रीवर्धन ७१५ कि.मी.
- महाड ६१.५०, मी.
- पोलादपूर ३०.५० कि.मी.
- उरण ८३.०५ कि.मी.
- एकूण १२६४.२३ कि.मी.