
मुंबई: महाराष्ट्राची राजधानी पुन्हा एकदा मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे ठप्प झाली आहे. पहाटेपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. ज्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. हवामान खात्याने मुंबई आणि आसपासच्या परिसरांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. अंधेरी, सायन, कुर्ला, दादर आणि वांद्रे भागात पाणी भरले असून, ज्यामुळे रेल्वे सेवा देखील उशिरा सुरू आहेत. त्याचप्रमाणे विमानसेवेतदेखील अडथळे निर्माण झाले आहेत.
जुहू-अंधेरी परिसर जलमय
मुंबई उपनगरात प्रसिद्ध जुहू परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने पादचाऱ्यांना व वाहनचालकांना हाल सहन करावे लागत आहेत. त्याचप्रमाणे, अंधेरी भागातील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक संथ झाली आहे. अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मुंबईत मुसळधार पाऊसामुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सामान्य वेळापत्रकाच्या तुलनेत १५ मिनिटे उशिरा धावत आहेत. बोरीवली ते दहिसर दरम्यान वायर तुटली आहे. त्यामुळे चर्चगेटच्या दिशेनं जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
आज कुठे किती पाऊस?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 48 तास मुंबईसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. तर पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागान दिलाय. तर, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.