महाड : महाड औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक युनिटवर छापा टाकून पोलिस व अमली पदार्थ नियंत्रण विभाग यांच्या संयुक्त कारवाईतून सुमारे ₹८८.९२ कोटी किमतीचा किटामाईन अमली पदार्थ जप्त करण्यात आला. बंद असलेल्या या कारखान्यात बेकायदेशीररीत्या रसायन प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे महाड औद्योगिक वसाहतीमधील बंद असलेले कारखाने आता पोलिसांच्या रडारवर असणार आहेत.
एमआयडीसीतील बंद कंपनीच्या प्रांगणात सुरू असलेल्या बेकायदेशीर रसायन प्रक्रियेवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणाहून ३४ किलो किटामाईन पावडर आणि १३ किलो लिक्विड किटामाईन असा एकूण साठा जप्त करण्यात आला.
या युनिटचा वापर कायदेशीर उत्पादनाऐवजी अमली पदार्थ निर्मितीसाठी केला जात असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले. सध्या काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक कारखाने बंद असून छुप्या पद्धतीने अशा प्रकारचे बेकायदेशीर व्यवहार सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही.