नवी दिल्ली : स्ट्रेलियातील मध्य ॲडलेडमध्ये चरणप्रीत सिंह या भारतीय विद्यार्थ्याला वर्णद्वेषी टिप्पणी करत मारहाण करण्याची घटना घडली. त्याच्यावर झालेल्या वर्णद्वेषी हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे ऑस्ट्रिलियात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. २३ वर्षीय चरणप्रीत सिंह हा १९ जुलै रोजी रात्री ९.२२ वाजता किंटोर अव्हेन्यूजवळ त्याच्या पत्नीसोबत गेला होता. यावेळी त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या जोडप्याने त्यांची कार पार्क केल्यानंतर त्यांना पाच जणांच्या गटाने घेरले.
हल्लेखोर एका वाहनातून बाहेर आले आणि त्यांनी थेट हल्ला केला. त्यांनी चरणप्रीत याच्यावर धारधार वस्तूंनी वार केले. पाच जण शिवीगाळ करत चरणप्रीतला लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण केल्यावर ते पळून गेले. या हल्ल्यानंतर चरणप्रीत रस्त्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसून आला. या हल्ल्यात चरणप्रीतच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या चेहऱ्यावर अनेक फ्रॅक्चर झाले आहेत. हॉस्पिटलमधून बोलताना त्याने म्हटले आहे की, गाडी पार्किंगवरून वाद सुरू झाला. त्यानंतर त्यांनी थेट हल्ला केला. त्यांनी आक्षेपार्ह उल्लेख करत शिवीगाळही केली. त्यानंतर त्यांनी लाथा-बुक्क्या मारण्यास सुरुवात केली, असेचरणप्रीतने सांगितले.
या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी एनफिल्ड येथून एका २० वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, उर्वरित हल्लेखोर अद्याप फरार आहेत. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. ज्या ठिकाणी घटना घडली तेथील सीसीटीव्हीचीदेखील तपासणी केली जात आहे. या हल्ल्यामुळे ॲडलेडमधील भारतीय समुदायाने संताप व्यक्त केला आहे.