
आसनगाव : डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या शहापूर तालुक्यातील भवरपाडा येथील गर्भवती महिलेला रस्त्याअभावी झोळीतून तब्बल एक किमी प्रवास करावा लागला. शहापूर तालुक्यातील महिन्याभरातील ही तिसरी घटना आहे. त्यातच भवरपाडा व परिसरात मोबाईल नेटवर्कची समस्या असल्याने महिलेला खासगी गाडीतून शहापूर उप-जिल्हा रुग्णालय गाठावे लागले. संबंधित महिलेची प्रकृती स्थिर आहे. शहापूरचे शुक्लकाष्ठ कधी संपणार हा प्रश्न आदिवासींना पडला आहे.
तालुक्यातील नडगाव ग्रामपंचायतीमधील चाफेवाडी, फुगाळे ग्रामपंचायतीमधील वरसवाडी येथील महिलांनी या समस्येचा सामना केला आहे. भवरपाडा येथील मनीषा भवर या महिलेला मंगळवारी दुपारी पोटात कळा येऊ लागल्या. धो-धो पाऊस, नेटवर्क अभावी संपर्क नाही त्यातच मुख्य रस्त्यापर्यंत किमान एक किमीचा रस्ता या महिलेला झोळीतून चिखलवाटेने प्रवास करत पार करावा लागला.
पारधीपाड्यापर्यंत आणून शहापूर उप-जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, वांद्रे ग्रामपंचायत अंतर्गत भवरपाडा, दोडकेपाडा व आलनपाडा येथे वनजमिनीच्या अडचणीमुळे या पाड्यांवर जाण्यासाठी रस्ताच नसल्याचे तेथील सरपंच मारुती साठे यांनी सांगितले. गेल्या तीन - चार वर्षांपासून रस्त्याला अडचण ठरणाऱ्या वनजमिनीचा प्रस्ताव सादर करूनही त्याला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे आदिवासींना
कसरत करावी लागते.