मुंबई : बीसीसीआयने भारताच्या पुढील वर्षी होणाऱ्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. टी-२० मालिका १ जुलै २०२६ पासून सुरू होईल आणि एकदिवसीय मालिका १४ जुलैपासून सुरू होणार आहे. त्यामुळे आता या निमित्ताने रोहित शर्मा आणि विराट
कोहलीला एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना पाहण्याची संधी क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहे. टी-२० मालिका १ ते ११ जुलै २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. मालिकेचा पहिला सामना डरहॅममध्ये खेळवण्यात येईल. दुसरा टी-२० २ जुलै रोजी मँचेस्टरमध्ये, तिसरा ७ जुलै रोजी नॉटिंगहॅममध्ये, चौथा ९ जुलै रोजी ब्रिस्टलमध्ये आणि शेवटचा ११ जुलै रोजी साउथहॅम्प्टनमध्ये खेळला जाईल. एकदिवसीय मालिकेला १४ जुलैपासून सुरुवात होणार आहे. पहिला एकदिवसीय सामना बर्मिंगहॅममध्ये खेळला जाईल.
दुसरा एकदिवसीय सामना १६ जुलै रोजी कार्डिफमधील सोफिया गार्डन्स क्रिकेट मैदानावर आणि मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना १९ जुलै रोजी लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर होणार आहे.
भारतीय महिला संघही पुढील वर्षी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या काळात संघ तीन टी-२० आणि एक कसोटी सामना खेळेल. ही कसोटी लॉर्ड्सवर होणार आहे. भारतीय महिला संघाच्या नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात खेळल्या गेलेल्या ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने वर्चस्व गाजवले. टी-२० मालिका ३-२ आणि एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली होती.