मँचेस्टर: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवला जात आहे. आज या सामन्याचा दुसरा दिवस आहे. सध्या इंग्लंडचा पहिला डाव सुरू आहे. इंग्लंडने धावसंख्या वाढवण्यास सुरूवात केली आहे. बेन डकेट आणि जॅक क्राऊली मैदानावर आहेत.
तत्पूर्वी, भारताचा पहिला डाव ३५८ धावांवर आटोपला. भारताच्या पहिल्या डावात ऋषभ पंत अर्धशतक ठोकण्यात यशस्वी ठरला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने पाच विकेट मिळवल्या. ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत सध्या इंग्लंडचा संघ २-१ अशा आघाडीवर आहेत. त्यामुळे शुभमन गिलच्या नेतृत्वातील टीम इंडियासाठी हा सामना करो वा मरोचा आहे.
असा होता भारताचा पहिला डाव
टॉस हरल्यावर पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाला यशस्वी जायसवाल आणि केएल राहुलने शानदार सुरूवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. यशस्वी ५८ आणि केएल राहुल ४६ धावा करून बाद झाले. त्यानंतर साई सुदर्शन आणि ऋषभ पंतनेही चांगली खेळी केली. सुदर्शनने या कसोटीत आपल्या करिअरमधील पहिले अर्धशतक ठोकत ६१ धावा केल्या. तर ऋषभ पंत ३७ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. पंत आता साधारण दोन महिने क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे.