Saturday, August 2, 2025

Kalyan: मारहाण झालेल्या तरुणीची परिस्थिती गंभीर; पॅरालिसीस होण्याची शक्यता!

Kalyan: मारहाण झालेल्या तरुणीची परिस्थिती गंभीर; पॅरालिसीस होण्याची शक्यता!

कल्याण: काल मंगळवारी, कल्याणमधील एका रुग्णालयात मराठी तरुणीला गोकुळ झा या परप्रांतीय युवकाकडून झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणाची एक मोठी अपडेट समोर आली आहे. मारहाण झालेल्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु असून, तिची परिस्थिती चांगली नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.


कल्याणमधील एका रुग्णालयात रिसेप्शन म्हणून कामाला असलेल्या मराठी तरुणीला, रुग्णालयात आलेल्या एका परप्रांतीय युवकाने क्षुल्लक कारणामुळे बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेची सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, मारहाण झालेल्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



पॅरालिसीस होण्याची शक्यता


सदर रुग्णालयाचे नाव जानकी रुग्णालय असे असून, तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तिच्या तब्येतीबाबत अपडेट दिली आहे. जानकी रुग्णालयाचे डॉक्टर मोईन शेख यांनी सांगितले की,तिच्या मानेवर जबर दुखापत झाली आहे. ⁠तिच्या पायावर आणि छातीवर मारल्याचे वळ आहेत. आम्ही तात्काळ उपचार सुरु केले आहेत. तसेच तरुणीला मान हलवताना खूप वेदना होत आहे. या मारहाणीमुळे तिला पॅरालिसीस होण्याची शक्यता आहे. तरुणीला सध्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.



पिढीत तरुणीची प्रतिक्रिया


पिढीत तरुणीने तिच्यावर घडलेला सर्व घटनाक्रम सागितला. ती म्हणाली "मी बाल चिकित्सालय क्लिनिक मध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. हा इसम अनन्या झा नावाच्या रुग्णाबरोबर आला होता. मी पहिल्यांदाच त्याला इथे पाहिले. तो आतमध्ये जाण्यासाठी खूप घाई करत होता. मी त्याला एवढंच बोलले की, तुमचा सध्या नंबर नाहीये, तुम्ही १० मिनिटे वाट बघा. तर त्याने मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने शिवीगाळ केल्यानंतर मी ही व्यक्ती माझ्याशी योग्य पद्धतीने बोलत नाही आहे, असे आमच्या सरांना सांगितले. मी त्याला असेही सांगितले की तू माझ्याशी नीट बोल. तर तो माणूस माझ्या अंगावर मारण्यासाठी धावला आणि त्यानंतर माझे केस पकडून दरवाजापर्यंत मला खेचत खेचत नेले. मला त्यांनी एवढे मारलं की माझा श्वासही थोड्या क्षणांसाठी थांबला होता."


दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणातील आरोपीला शिक्षा करण्याची मागणी होत आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये मराठी भाषेवरुन वाद पेटला आहे. आता यातच परप्रांतीय तरुणाने मराठी तरुणीला मारहाण केल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा उपस्थित होत आहे.

Comments
Add Comment