मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके
गील लेखात आपण त्राटक म्हणजे काय आणि त्राटकाच्या पूर्वतयारीविषयी जाणून घेतलं.
संक्षेपानं सांगायचं तर त्राटक म्हणजे एखादं लक्ष निश्चित करून त्याकडे एक टक पाहण्याची क्रिया, ज्यामुळे दृष्टीबरोबरच मनही एकाग्र व्हायला मदत होते. त्राटकाचे समीप आणि सुदूर असे दोन प्रकार आहेत. या दोन प्रकारांपैकी समीप त्राटकाचा विचार प्रस्तुत लेखात
केला आहे.
१. समीप त्राटक - समीप म्हणजे जवळ. जवळ म्हणजे दृष्टीच्या टप्प्यात ठेवलेल्या एखाद्या लक्ष्यावर दृष्टी केंद्रित करणं म्हणजे समीपत्राटक. याची व्याख्या हठप्रदीपिका या ग्रंथात पुढीलप्रमाणे दिली आहे.
निरीक्षेन्निश्चलदृशा सूक्ष्मलक्ष्यं समाहितः।
अश्रुसम्पातपर्यन्तमाचार्यैस्त्राटकं स्मृतम्।।
हठप्रदीपिका २-३१।।
अर्थ - सूक्ष्मलक्ष्याकडे निश्चल दृष्टीनं, चित्त एकाग्र करून, डोळ्यांतून अश्रू येईपर्यंत पाहणं या क्रियेला आचार्य त्राटक असं म्हणतात.
या श्लोकातच त्राटकाची प्रक्रिया थोडक्यात पण नेमक्या शब्दांत वर्णन केली आहे. दोन त्राटकप्रकारांपैकी समीप त्राटक अधिक लोकप्रिय आणि सहज करण्याजोगं आहे. अनेक संस्थांमध्ये समीपत्राटकाचाच सराव घेतला जातो. समीपत्राटकासाठी एखादी वस्तू लक्ष्य म्हणून निश्चित करावी लागते. बरेचदा तुपाचा किंवा तेलाचा दिवा, मेणबत्ती किंवा ओंकाराची प्रतिमा अशा वस्तू लक्ष्य म्हणून ठेवल्या जातात. ज्यावर लक्ष केंद्रित करायचं अशी वस्तू मन शांत आणि सकारात्मक करणारी हवी.
समीपत्राटक करण्याची सविस्तर प्रक्रिया पुढीलप्रमाणे -
- दृष्टी केंद्रित करण्यासाठी ठेवलेली लक्ष्य वस्तू डोळ्यांच्या समपातळीत डोळ्यांना सहज दिसेल इतक्या अंतरावर हवी. वस्तू डोळ्यांच्या पातळीच्या वर अथवा खाली ठेवली तर मानेवर तसेच डोळ्यांवरही ताण येऊ शकतो. ही वस्तू डोळ्यांपासून फार लांब अथवा जवळ नसावी. पाहताना डोळ्यांवर तसेच मानेवर, पाठीवर अजिबात ताण येणार नाही अशा योग्य अंतरावर असली पाहिजे.
- साधकानं पद्मासन, अर्धपद्मासन, वज्रासन इत्यादी कोणतेही ध्यानात्मक आसन किंवा सुखासनात म्हणजे साधी मांडी घालून बसावं. ज्यांना जमिनीवर बसायला जमत नाही त्यांना खुर्चीत बसूनही त्राटक करता येते; परंतु अशा साधकांनी लक्ष्य म्हणून ठेवलेली वस्तू योग्य अंतरावर आणि उंचीवर ठेवण्याची दक्षता घ्यावी.
- काही वेळ शांत बसावं जेणेकरून शरीराला आणि मनाला स्थिरता येईल.
- यानंतर लक्ष्य वस्तूकडे पाहायला आरंभ करावा. डोळ्यांची अजिबात उघडझाप न करता परंतु डोळ्यांवर ताण न येऊ देता एक टक पहावं. पाहताना संपूर्ण दीप, त्याचा सभोवती पसरलेला प्रकाश, दिव्याची ज्योत, ज्योतीमध्ये दिसणारा लालसर गाभा यावर लक्ष केंद्रित करण्याचा
प्रयत्न करावा. - डोळ्यांतून पाणी येईपर्यंत एकटक पाहण्याची ही क्रिया चालू ठेवावी.
- त्राटकाचा सराव सुरू केल्यानंतर सुरुवातीला अगदी कमी वेळात डोळ्यांतून पाणी येतं परंतु जस जसा सराव होतो तस तसा एक टक पाहण्याचा कालावधी वाढत जातो.
या वर्णन केलेल्या त्राटकाच्या प्रक्रियेला बहिर्त्राटक असं म्हणतात. या प्रक्रियेत बाहेरच्या वस्तूवर लक्ष केंद्रित केलं जातं म्हणून त्याला बहिर्त्राटक असं म्हणतात. हे त्राटक केल्यानंतर, डोळे मिटले की आंतर्त्राटकाची प्रक्रिया सुरू होते. - डोळे मिटल्यावर सुरुवातीला बाहेर पाहिलेल्या दिव्याची थोडी धूसर अथवा जशीच्या तशी प्रतिमा भ्रुमध्यात म्हणजे भुवयांच्या मध्ये दिसते. त्यावर लक्ष केंद्रित करावं. काही वेळानी ही प्रतिमा नाहीशी होते; परंतु मंद आणि शांतपणे तेवणाऱ्या ज्योतीचा तसेच लक्ष केंद्रित झाल्यामुळे जाणवणाऱ्या शांततेचा अनुभव घ्यावा.
बहिर्त्राटक आणि आंतर्त्राटक साधनेचे तीन टप्पे
- संपूर्ण दिव्याचा अथवा मेणबत्तीचा उघड्या डोळ्यांनी पापणी न मिटता अनुभव घेणं. आंतर्त्राटकात डोळे मिटल्यावरही प्रथम संपूर्ण दिव्याची जाणीव ठेवणं.
- त्यानंतर दोन्ही त्राटकांमध्ये दिव्याची केवळ ज्योत तसेच ज्योतीच्या मध्यभागी, वातीच्या भोवती दिसणारा लालसर गाभा याचीच जाणीव ठेवणं.
- त्यानंतर ज्योतीच्या भोवती पसरलेला प्रकाश, त्यामध्ये दिसणारे सूक्ष्म कण यांवर इंद्रिय आणि मन केंद्रित करून जाणीव अधिक विस्तृत करणं.
बहिर्त्राटक आणि आंतर्त्राटक यांचा जितका सराव करावा तितकी मनाची एकाग्रता वाढत जाते आणि जाणिवेच्या कक्षा रुंदावतात. - पुढील लेखामध्ये सुदूर त्राटक तसेच त्राटकाचे लाभ इत्यादी विषयांचा विचार करू.