बंगळुरु : भारतीय फलंदाज करुण नायर तीन हंगामांनंतर कर्नाटक संघात परतणार आहे. गेल्या दोन हंगामांपासून नायर विदर्भासोबत होता. विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यामुळे तो पुन्हा त्याच्या मूळ राज्य संघासाठी खेळू शकेल.
विदर्भाला तिसरी रणजी ट्रॉफी जिंकण्यास करुण नायरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने १६ डावांमध्ये ५३.९३ च्या सरासरीने चार शतकांसह ८६३ धावा केल्या होत्या. नायरच्या याच चमकदार कामगिरीमुळे त्याला आठ वर्षांनंतर भारताच्या कसोटी संघात परतण्याची संधी मिळाली होती. केरळविरुद्धच्या अंतिम सामन्यात विजयी शतक त्याने झळकावले होते.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये नायरने विक्रमी कामगिरी केली आहे. त्याने विदर्भाला उपविजेतेपदापर्यंत नेले होते.आठ डावांमध्ये १२४.०१ च्या स्ट्राईक रेटने ७७९ धावा केल्या होत्या.ज्यामध्ये सलग पाच शतकांचा समावेश आहे. या स्पर्धेदरम्यान त्याने लिस्ट ए मध्ये एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. आणि बाद न होता ५४२ धावा करत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला.
इंग्लंड दौऱ्यातील त्याची कामगिरी आतापर्यंत तितकी प्रभावी राहिलेली नाही. बेकेनहॅम येथे इंग्लंड लायन्स विरुद्ध इंडिया अ संघाकडून द्विशतक झळकावूनही त्याने आतापर्यंत खेळलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये ०, २०, ३१, २६, ४० आणि १४ धावा केल्या आहेत.