तिरुवनंतपुरम : तांत्रिक बिघाडामुळे केरळमधील तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर १४ जूनपासून अडकून पडलेले एफ - ३५ लढाऊ विमान अखेर २२ जुलै रोजी उडाले. हे विमान तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन खोल समुद्रात उभ्या असलेल्या इंग्लंडच्या विमानवाहक नौकेवर उतरणार आहे.
भारतात उतरलेले विमान दुरुस्त करुन पुन्हा उड्डाणासाठी सज्ज करण्याकरिता इंग्लंडमधून अभियंत्यांचे विशेष पथक तिरुवनंतपुरम येथे आले होते. या पथकाने दुरुस्ती आणि सुरक्षा तपासणी पूर्ण केली. यानंतर विमानाने २२ जुलै रोजी उड्डाण केले. भारताने १४ जून ते २२ जुलै या काळात केलेल्या सहकार्यासाठी इंग्लंडने भारताचे आभार मानले आहेत. भारतासोबतची आमची संरक्षण भागीदारी मजबूत करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असेही याप्रसंगी इंग्लंडने सांगितले.
खराब हवामान आणि कमी इंधनामुळे शाही नौदलाच्या एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्सवरून उड्डाण केल्यानंतर इंग्लंडचे एफ - ३५ लढाऊ विमान तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले होते. हे पाचव्या पिढीचे आधुनिक स्टेल्थ जेट विमान होते. गंभीर तांत्रिक बिघाडामुळे हे विमान पाच आठवडे भारतात अडकून पडले होते. लँडिंग गिअर, ब्रेक यांच्यासह अनेक यंत्रांच्या दुरुस्तीनंतर अखेर विमान उड्डाण योग्य स्थितीत पोहोचले. यानंतर विमान हँगरमधून बाहेर काढून धावपट्टीजवळ आणण्यात आले. नंतर नियोजनानुसार विमानाचे उड्डाण झाले.
याआधी जेव्हा भारतात विमान उतरले त्यावेळी किरकोळ समस्या असेल असे समजून वैमानिकाने विमान उघड्यावरच पार्क केले. सुरक्षेच्या कारणास्तव विमान हँगरमध्ये हलवण्यास वैमानिकाने विरोध केला. पण बिघाड गंभीर स्वरुपाचा आहे आणि पावसात भिजल्यामुळे विमानातील समस्या आणखी गुंतागुंतीच्या झाल्याचे लक्षात आल्यावर विमान हँगरमध्ये हलवण्यास वैमानिकाने होकार दिला. यानंतर हँगरमध्ये इंग्लंडमधून आलेल्या अभियंत्यांनी विमानाची दुरुस्ती करुन ते उड्डाणासाठी योग्य स्थितीत आणले.
विमान दुरुस्त झाले नसते तर त्याचे सुटे भाग करुन ते मालवाहक विमानातून नेण्याची तयारी इंग्लंडने केली होती. पण सुदैवाने हे संकट टळले. तरी लढाऊ विमान दुरुस्त करण्यासाठी इंग्लडला एक महिन्यापेक्षा जास्त काळ लागल्यामुळे सोशल मीडियात चर्चेला उधाण आले आहे.
F- 35 विमानाचे सामर्थ्य
लॉकहीड मार्टिनने बनवलेले F-35B हे जगातील सर्वात प्रगत आणि महागड्या लढाऊ विमानांपैकी एक आहे, ज्याची किंमत प्रत्येकी USD ११५ दशलक्ष पेक्षा जास्त आहे. ते लहान टेक-ऑफ आणि उभ्या लँडिंगसाठी डिझाइन केलेले आहे आणि ते नाटोच्या हवाई शक्तीचा आधारस्तंभ आहे. पण तांत्रिक बिघाडामुळे केरळमधील तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर १४ जूनपासून अडकून पडलेले एफ - ३५ लढाऊ विमान अखेर २२ जुलै रोजी उडू शकले.
मिम्स व्हायरल
इंग्लंडचे लढाऊ विमान पाच आठवडे भारतात अडकून पडले होते. या निमित्ताने सोशल मीडियात मिम्सचा पाऊस पडत होता. अनेकांनी इंग्लंडच्या हवाई दलाची तसेच एफ - ३५ लढाऊ विमानांची खिल्ली उडवणारे मिम्स शेअर केले होते.