सखल भागात पाणी साचले! अंधेरी सब वे पाण्याखाली
मुंबई : मुंबईत विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पहाटेपासून जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती, मात्र आज पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
उपनगरांत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून, अंधेरी सब-वे (Andheri Subway) पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक थांबवण्यात आली आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल वाहतूक मंदावली आहे, ज्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. पश्चिम आणि पूर्व उपनगर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे सखल भागांत पाणी भरण्यास सुरुवात झाली असून, लालबहादूर शास्त्री मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.
सध्या आकाशात काळे ढग दाटून आले असून, आज दिवसभर पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय पुढील आठवडाभर हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' (Yellow Alert) देण्यात आला असून, पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महिलेचा 'हिंदीतच बोला'चा आग्रह, व्हिडिओ व्हायरल! मुंबई : राज्यात सध्या मराठी भाषेचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे, त्यातच ...
दुसरीकडे हवामान विभागाकडून सध्या तरी कोणत्याही जिल्ह्याला 'ऑरेंज' (Orange) किंवा 'रेड अलर्ट' (Red Alert) देण्यात आलेला नाही. आयएमडीने मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, हिंगोली या ७ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी केला आहे. आज सकाळी ९.१८ वाजता समुद्रात काही मिनिटांसाठी उंच लाटांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, २२ जुलै रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, रायगड जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. त्यानंतर २३ जुलै रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, रायगडसह पुण्यालाही 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. त्यामुळे हा आठवडा पावसाचा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.