राज्यातील ४५ हजार परिचारिका संपात सहभागी
मुंबई : सातव्या वेतन आयोगात स्टाफ नर्सेसची झालेली उपेक्षा आणि कंत्राटी पद्धतीने केलेल्या नियुक्त्यांच्याविरोधात राज्यातील सरकारी रुग्णालयांतील सुमारे ४५ हजार परिचारिकांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले असून, राज्यातील आरोग्यसेवा पूर्णपणे कोलमडली आहे. शनिवारी या संपाचा तिसरा दिवस होता. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू असून नियमित शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यात रोज होणाऱ्या २००० हून अधिक शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जात आहेत.
सुरुवातीला सरकारी रुग्णालयांतील परिचारिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. मात्र या आंदोलनाची दखलच राज्य सरकारने घेतली नाही. परिणामी, गुरुवारपासून या परिचारिकांनी बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या संपात मुंबईतील सुमारे २५०० हून अधिक परिचारिका सहभागी आहेत. जे. जे. रुग्णालयातील ९५०, जी. टी. रुग्णालयातील ३५०, कामा रुग्णालयातील परिचारिकांच्या संपामुळे आरोग्य सेवा कोलमडली ९०, सेंट जॉर्ज रुग्णालयातील ३०० आणि राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील ३००, मिरा भाईंदर ७४, कांदिवली ५०, मुलुंड ८०, वरळी ४०, पालघर ४, अंबरनाथ २ येथून परिचारिका सहभागी झाल्यने या रुग्णालयातील सेवेला फटका बसल्याचे दिसते.
राज्यभरातील सरकारी दवाखान्यांमधील मिळून संपावर गेलेल्या परिचारिकांची संख्या ४५ हजारांच्या घरात असल्याचे रुग्णालय प्रशासनाने योग्य खबरदारी घेत रुग्णसेवा बाधित होणार नाही याची काळजी घेतली.
रुग्णालयातील शिकाऊ परिचरिका व वरिष्ठ श्रेणी असलेल्या परिचारिकांची रुग्णकक्ष व शस्त्रक्रियागृहामध्ये नियुक्ती केली मात्र तरिही संपाचा परिणाम दिसून येत आहे. रुग्णालयात फक्त अत्यावश्यक सेवा दिल्या जात आहेत. अत्यावश्यक असल्याशिवाय रुग्णाला डमिटही केले जात नाही. नियोजित शस्त्रक्रिया असलेल्या रुग्णांची परत पाठवले जात आहे. जे जे रुग्णालयात नियमित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या असून फक्त अत्यावश्यक सेवा सुरु असल्याचे जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी सांगितले.
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचाही पाठिंबा
आता शासकीय रुग्णालयांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांनीही परिचारिकांच्या संपाला पाठिंबा जाहीर केल्याने हा संप चिघळण्याची चिन्हे आहेत. वॉर्ड बॉय, सफाई कामगार आणि लिपिक देखील परिचारिकांच्या संपात आता सहभागी होऊ शकतात. चतुर्थ श्रेणी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून परिचारिकांच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
परिचारिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत रुग्णालयांमध्ये काम करणारे लिपिक, सफाई कामगार, वॉर्ड बॉय यांच्यासह १० हजार चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपात सहभागी होतील, असा इशाराही पठाण यांनी दिला आहे.
परिचारिकांच्या संपाचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर होत असल्याने आता काही रुग्णालयांकडून कामावर हजर राहा, अन्यथा निलंबन करू अशी पत्रे दिली जात आहेत. मात्र, परिचारिका कोणत्याही दडपणाखाली न येता मागण्यांवर निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नाहीत. असे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष मनिषा शिंदे यांनी म्हंटले आहे.