अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील बागोदरा गावातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांनी राहत्या घरात विष प्राशन करून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सर्व पाचही मृतदेह घरात सापडले आहेत.
हे कुटुंब मूळचे ढोलका येथील होते, परंतु सध्या बागोदरा गावात भाड्याच्या घरात राहत होते. या कुटुंबाने सामूहिक आत्महत्येचे हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, प्राथमिक तपासात हे कुटुंब आर्थिक अडचणीत होते असे दिसून येत आहे.
ऑपरेशन सिंदूरवर चर्चेसाठी सरकार तयार बिहार निवडणुकीतील घोटाळ्यांच्या आरोपांवरही निवेदन देणार नवी ...
मृतांमध्ये ३४ वर्षीय विपुलभाई कानाभाई वाघेला, त्यांची पत्नी २६ वर्षीय सोनलबेन विपुलभाई वाघेला, ११ वर्षीय मुलगी सिमरन विपुलभाई वाघेला, ८ वर्षीय मुलगा मयूर विपुलभाई वाघेला आणि ५ वर्षीय धाकटी मुलगी विपुलभाई वाघेला यांचा समावेश आहे. विपुल रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
या घटनेची माहिती मिळताच बागोदरा पोलीस आणि १०८ आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अहमदाबाद ग्रामीण एसपी पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा (LCB), विशेष ऑपरेशन ग्रुप (SOG) आणि धांधुका एएसपी (ASP) यांनीही घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या सुरू आहे.
पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी बागोदरा सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत. कुटुंबाने हा निर्णय का घेतला याचा शोध पोलीस घेत आहेत. प्राथमिक तपासात कुटुंबातील सदस्यांचे मोबाईल फोनही दोन दिवसांपासून बंद असल्याचे समोर आले आहे.