प्रल्हाद जाधव
श्रावण म्हटले की, रसिक मराठी माणसाला लगेच बालकवींची कविता आठवते.
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे…
या कवितेने श्रावण महिन्याचे जणू एक प्रत्ययकारी आणि चिरंतन चित्र रेखाटून ठेवले आहे. श्रावण म्हणजे काय हे समजावून सांगायचे झाले तर ही कविता समोर ठेवली की काम भागू शकते!
श्रावण म्हटले की, सर्वदूर पसरलेली मुलायम हिरवळ, आकाशातील इंद्रधनुष्याची कमान, ऊन-पावसाचा लपंडाव, पूजेसाठी नटून-थटून निघालेल्या ललना, त्यांच्या चेहऱ्यावरचे सात्त्विक भाव, मुलींची गाणी, खेळ, आंबे, फणस, जांभळे, विविध प्रकारच्या रानभाज्या, शाकाहार, उपासतापास, व्रतवैकल्ये अशा अनेक गोष्टी नजरेसमोर येतात.
आषाढातील पावसाचा पहिला तुफानी हल्ला झेलताना ‘नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी’ ही इंदिरा संतांची कविता म्हणून झालेली असते. तो आक्रमक, उग्र पाऊस संपत आला की श्रावणातल्या ‘सरीवर सरी’ हे त्याचे नवे मोहक रूप सर्वांना हवेहवेसे वाटत असते. श्रावणसरी आणि अधूनमधून पडणारे सोनेरी ऊन हे निसर्ग आणि माणूस यांच्यातील लडिवाळ अनुबंध उलगडून दाखवणारे असते. त्या पार्श्वभूमीवर ‘क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे’ ही बालकवींची नाट्यमय ओळ त्या भावावस्थेला अतिशय प्रत्ययकारी असे शब्दरूप देऊन जाते.
या कवितेच्या पाठोपाठ श्रावणाच्या पार्श्वभूमीवर दुसरे गाणे आठवते ते मंगेश पाडगावकरांचे. अर्थात्
श्रावणात घननिळा बरसला
रिमझिम रेशीमधारा
उलगडला पानातून अवचित
हिरवा मोरपिसारा...
हे गाणे लागले की, श्रावण महिना सुरू झाल्याची बातमी मिळावी इतके ते श्रावणाशी एकरूप झालेले आहे. या गाण्यातील शब्दमाधुर्य आणि पाडगावकरांनी उभे केलेले श्रावणाचे व्यक्तिमत्त्व अभूतपूर्व असे आहे. झाडांतून उलगडणारा हिरवा मोरपिसारा ही कल्पना त्यांनाच सुचो जाणे! खरे तर झाडांना पालवी फुटते ती वसंतात किंवा चैत्रात; त्यामुळे श्रावण महिन्यात झाडातून हिरवा मोरपिसारा कसा काय उलगडत असावा असा एक प्रश्न पडू शकतो. पण ते लक्षात यायचे तर त्यासाठी त्याच श्रेणीची रसिकवृत्ती आपल्याजवळ हवी! एकूण काय तर कवी मंडळींना कल्पनाविश्वात तरंगणे आणि रसिकांना त्यांनी निर्माण केलेल्या भावविश्वात रममाण होणे आवडते.
मराठीच्या विविध बोलींतील लोकगीते, कथा-कहाण्या यांबरोबरच सरोजिनी बाबर आणि शांताबाई शेळके यांच्या त्यावरील निरूपणांनी सारे ग्रामजीवन रोमँटिक करून टाकले आहे, पण आता तो इतिहास झाला. एखाद्या झाडाला झोका बांधून परकर पोलक्यातील मुली त्यावर झोके घेत गाणी म्हणत आहेत असे दृश्य आता केवळ एखाद्या जुन्या चित्रपटात किंवा पेंटिंगमध्येच पाहायला मिळते हे खोटे आहे का?
पूर्वी गावचे एकेक घर म्हणजे पंचवीस-पंचवीस, तीस-तीस माणसांचे खटले असायचे. तो लवाजमा घोळक्याने गावाबाहेर पूजेला, सण समारंभाला, एकमेकांच्या भेटीगाठीसाठी निघाला की, त्यातून एक मनोहारी दृश्यबंध निर्माण व्हायचा. आता कुटुंबव्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली आहे. गावे बरबाद झाली आहेत. गावात माणसेच राहिली नाहीत. त्यामुळे या परंपरा कोण पुढे नेणार असा प्रश्न आहे. जी माणसे शहरात आली त्यांनाही सण-समारंभापेक्षा पोटापाण्याची विवंचना अधिक आहे हे स्पष्ट दिसते.
नटून-थटून पूजेला जाणाऱ्या ललना ही तर एक दंतकथा ठरली आहे. त्यांच्या त्या नऊवारी साड्या, ते दागिने, तो प्रसन्न उत्साह (इव्हेंट्स वगळता) आता कोठे दिसतो? आणि बायकांना नटायला थटायला इतका वेळ तरी आहे कोठे? अशा रोमँटिक स्त्री प्रतिमा वापरून एखादे गोड हळवे चित्र निर्माण करणे यामागे बाजारपेठ आणि व्यापारी मुत्सद्दीपणा आहे हे स्पष्टपणे लक्षात येते.
श्रावणातल्या बालकवींच्या त्या हिरवळीचे आणि झाडातून उलगडणाऱ्या पाडगावकरांच्या त्या हिरव्या मोरपिसाऱ्याचे पुढे काय झाले असा प्रश्न पडतो. मी अधून-मधून अनेक ठिकाणी फिरत असतो. पावसाळ्यातही भ्रमंती सुरू असते. कोकणात जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी शेतीभाती वगळता एखादे माळरान दिसले तर त्यावरील काटेरी तारा आणि सिमेंटच्या खांबांनी विभागणी केलेले कुंपण पाहून जीव व्याकुळ होऊन जातो. हे दृश्य भारतभर सर्वत्र दिसते हे मी अनुभवाने सांगत आहे.
‘मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे’ असे केशवसुतांनी ‘नवा शिपाई’ या कवितेत म्हटले आहे. पण बालकवींचे ते ‘हिरवे हिरवेगार गालिचे’ आपण ताराच्या कुंपणांनी आणि सिमेंटच्या खांबांनी कायमचे बंदिस्त करून टाकले. त्यासोबतच विश्वबंधुत्वाचे स्वप्न पाहणाऱ्या माणसाच्या कल्पनेचे पंखही नकळत आपण कापत आहोत हे त्याच्या लक्षात येत नाही हे दुर्दैव!
कोकणात जाताना रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी तोडलेली झाडे, त्यांचे ते भेसूर बुंधे, चिखल-गटारे, खडी-मातीचे डोंगर, रस्त्याची विभागणी करणाऱ्या तुरुंगांसारख्या राक्षसी भिंती आड येत राहतात. रस्ता रुंदीकरणाच्या उद्योगात ठिकठिकाणचे ओहोळ, पाणवठे, पाणथळ जागा, ज्ञात-अज्ञात परिसंस्था, पशुपक्षी, कीटक-फुलपाखरे यांचे इतके नुकसान झाले आहे की, ते भरून निघणे अशक्य आहे! श्रावण महिन्यातील प्रवासातील आनंद अधोरेखित करणारी ती रोमँटिक अनुभूती कायमची भूमिगत होऊन गेली आहे.
हवामान बदल हा एक जागतिक चिंतेचा विषय आहे. महापूर, भूकंप, भूस्खलन, मोठमोठ्या आगी ही निसर्गाच्या संतापाची रूपे आहेत, पण ते माणसाच्या लक्षात येत नाही.
माणसाचे काय घेऊन बसलात, बदलत्या हवामानामुळे खुद्द श्रावणाचेच वेळापत्रक बदलून गेले आहे. तो गोंधळलेला आहे. म्हणजे भिंतीवरील कॅलेंडरमध्ये तो वेळच्या वेळी येतो. पण प्रत्यक्ष जीवनात तो भरकटलेला आहे हे लक्षात घ्यायला हवे. जागोजागी तुंबणारी गटारे आणि ठप्प होणारी वाहतूक हे त्याचे पुरावे आहेत. सरीवर सरी येतीलच याची खात्री नाही. किंबहुना आडवा-तिडवा पाऊस किंवा अंग भाजून काढणारे ऊनही श्रावणात पडू शकते आणि त्यात कुणाला काहीच गैर वाटत नाही. हे चित्र शहरातच नाही तर खेडोपाडी सर्वत्र दिसू लागले आहे.
बाहेरची हिरवळ म्हणजे दृष्टीसुख आणि आतील हिरवळ म्हणजे आपली संवेदना. दोन्ही आपले अर्थ आणि स्वरूप बदलण्याच्या मार्गावर आहेत. हिरवळ हळूहळू आकसत चालली आहे आणि संवेदना बधिर होऊ लागल्या आहेत. पुढे हिरवळ हळूहळू नाहीशी होऊ लागेल. ती गेली की त्या पाठोपाठ फुले, फुलपाखरे जातील आणि मग माणसाला तरी काय वेगळे अस्तित्व राहणार आहे?
या बदललेल्या, गोंधळलेल्या श्रावणाचे मन समजून घ्यायचे तर आपण काहीतरी गमावून बसत आहोत याची जाणीव आधी व्हायला हवी. त्यातून आपल्यातील नवा आत्मविश्वास जागा झाला, नवे आत्मभान उदयाला आले तरच श्रावणाचे गोडवे गाण्याचा अधिकार आपल्याला राहील!
मराठी रसिकासाठी श्रावण हा केवळ दिनदर्शिकेवरील एक महिना नाही, तर त्याच्या भावविश्वातील ती एक लोभस प्रतिमा आहे. मात्र काळाच्या ओघात त्या प्रतिमेचा अर्थ बदलत चालला असून तो आपण लक्षात घेतला नाही, तर ती एक आत्मवंचना ठरेल!