नवी दिल्ली : आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणांमध्ये ईडीने गुगल आणि मेटा या जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांना समन्स पाठवत २१ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या कंपन्यांवर बेकायदेशीर बेटिंग अॅप्सचा प्रचार केल्याचा आरोप आहे. काही आठवड्यांपासून ईडी विविध ऑनलाइन बेटिंग अॅप्सच्या जाळ्याचा तपास करत आहे. या अॅप्सना कौशल्याधारित गेम्स असल्याचा बनाव करून प्रत्यक्षात जुगारासाठी वापरले जात होते. या प्लॅटफॉर्म्सवरून हजारो कोटींचा काळा पैसा निर्माण झाल्याचा संशय असून, तो हवाला मार्गाने परदेशात पाठवण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुगल व मेटा यांनी या बेटिंग अॅप्सना जाहिरातीसाठी प्राधान्य स्थान उपलब्ध करून दिले.