मुंबई: बॉलिवूडमधील आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा सोनू सूद आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. आपल्या समाजकार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सोनू सूदचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्याने अनेकांची मनं जिंकली आहेत.
नुकताच सोनू सूदने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याने चक्क एका सापाला आपल्या हातांनी पकडल्याचं दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनू सूदच्या सोसायटीमध्ये एक साप शिरला होता. कोणताही धोका पत्करू न देता, सोनूने त्या सापाला मोठ्या शिताफीने हाताने पकडले आणि एका पोत्यात सुरक्षितपणे बंद केले. त्यानंतर त्याने आपल्या गार्डला तो साप जंगलात सोडून देण्यास सांगितले, ज्यामुळे त्या सापाला जीवनदान मिळालं.
या व्हिडीओमध्ये सोनू सूदने महत्त्वाचा संदेशही दिला आहे. तो म्हणतो, "हा साप आमच्या सोसायटीत आला. हा एक रॅट स्नेक आहे. तो विषारी नाही. तुमच्या परिसरात किंवा सोसायटीत असा साप आढळल्यास कृपया साप पकडणाऱ्या तज्ञांना बोलवा. पण, काळजी घेणं गरजेचं आहे. मला साप पकडायची टेक्निक माहीत आहे, म्हणून मी त्याला पकडलं, पण काळजी घ्या."
सोनू सूदच्या या धाडसी आणि जबाबदार कृतीमुळे त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.