नाशिक: जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्यांवरील लैंगिक छळ प्रकरणाची शहर पोलिसांच्या महिला सुरक्षा विभागाने दखल घेतली आहे. सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेला भेट देवून माहिती घेण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे.
गेल्या दोन आठवड्यापासून जिल्हा परिषदेतील लैंगिक छळ प्रकरणाची चर्चा होत असून, त्याचे पडसाद विधीमंडळाच्या अधिवेशनात उमटले. ग्रामविकास मंत्र्यांनी एका अधिकाऱ्याला निलंबीत तर एकाला सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश दिले. या प्रकरणातील एक अधिकारी चौकशी होण्यापुर्वीच रजेवर निघून गेला आहे. राज्यभर या प्रकरणाची चर्चा होत असून, अजुन काही अधिकाऱ्यांच्या विरोधातही अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
त्या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत जावून चौकशीचा प्रयत्न केला. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी रजेवर असल्याने त्यांच्या चौकशीला मर्यादा पडल्या. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशाखा समिती अध्यक्षांशी या अधिकाऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीवरून गृह विभागानेच या संदर्भातील आदेश पोलीस यंत्रणेला दिल्याचे समजते.