मुंबई : वैष्णवी हगवणे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी विधिमंडळाच्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीने प्रथम अहवाल सादर करत तपास प्रक्रियेत गंभीर त्रुटी असल्याचे नमूद केले आहे. हा प्रकार केवळ आत्महत्येचा नसून, हे प्रकरण स्पष्टपणे कौटुंबिक अत्याचार, हुंडाबळी व अमानुष छळाचे असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे तपासाची दिशा बदलून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारच्या वतीने आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने शुक्रवारी विधानसभेत आपला अहवाल सादर केला. समितीच्या निरीक्षणानुसार, वैष्णवी यांच्यावर पती व सासरच्या लोकांकडून सातत्याने छळ, मारहाण व मानसिक अत्याचार करण्यात येत होता. यासोबतच हुंड्याच्या माध्यमातून ब्रँडेड गाडी, चांदीची भांडी, दागिने व रोख रक्कम घेतल्याचे ठोस पुरावे समितीपुढे सादर करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास अत्यंत संथ गतीने सुरू असून, आरोपी वा सहआरोपी कोणतेही पुरावे नष्ट करून सुटून जाऊ नयेत यासाठी तातडीने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे समितीने सरकारला सूचना केल्या आहेत.
जालिंदर सुपेकर यांचा हस्तक्षेप पुण्यातील तत्कालीन पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचा या प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे समोर आल्याचे समितीने नमूद केले. सुपेकर यांच्या एका संभाषणाची ध्वनीफित सार्वजनिक झाली असून, तिची न्यायवैद्यकीय (फॉरेन्सिक) तपासणी करून, सुपेकर यांना तत्काळ निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली आहे. याचप्रमाणे, त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात 'रुखवत' या नावाखाली आलेली हुंड्याची रक्कमही संशयास्पद असल्यामुळे सुपेकर पती-पत्नींना सहआरोपी म्हणून तपासात सामील करण्याचे आदेश देण्यात यावेत, असे समितीने स्पष्ट केले आहे.
१६७६ पानी आरोपपत्रात ११ आरोपींच्या नावाचा समावेश
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वतीने १६७६ पानांचे आरोप पत्र सादर करण्यात आले आहे. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर ५९ दिवसांनी हे दोषारोप पत्र सादर करण्यात आले आहे. या प्रकरणात सासू, सासरे, पती, नणंद आणि दीर यांच्या छळाला कंटाळून वैष्णवी यांनी १६ मे २०२५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली होती. पोलिसांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रात एकूण ११ आरोपींच्या नावाचा उल्लेख करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये आरोपी फरार असताना आरोपींना मदत करणाऱ्यांचाही समावेश आहे.