मुंबई : मुंबईत डिजिटल पेमेंट क्यूआर कोडद्वारे फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, एका अज्ञात इसमाने दुकानांबाहेर लावलेले मूळ क्यूआर कोड त्याच्या स्वतःच्या क्यूआर कोडने बदलून ग्राहकांचे पेमेंट त्याच्या वैयक्तिक बँक खात्यात वळवले आहे . खार पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे, ज्याने दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरातील शेकडो दुकानांबाहेर स्वतःचे क्यूआर कोड ठेवल्याची कबुली दिली आहे.
खार (पश्चिम) येथील एका दुकानदाराला हि बाब लक्षात आली . ग्राहक नियमितपणे यूपीआयद्वारे पेमेंट करत असूनही, त्यांच्या मोबाइल वर कुठलाही मेसेज येत नव्हता . सुरुवातीला त्यांना त्यांच्या यूपीआय मशीनमध्ये बिघाड झाल्याचा संशय आला कारण पेमेंटनंतर नेहमी येणारा अलर्ट वाजणे बंद झाले होते.
ग्राहकांनी केलेल्या पेमेंटचे मेसेज त्यांच्या फोनवर पूर्णपणे दिसणे बंद झाल्यावर, गुप्ता यांनी स्वतः क्यूआर कोड स्कॅन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना धक्का बसला, कोडमध्ये त्यांच्या स्वतःच्या ऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचे नाव येत होते . बारकाईने तपासणी केल्यावर त्यांना आढळले की कोणीतरी त्यांच्या मूळ क्यूआर कोडवर वेगळा क्यूआर कोड लावला आहे.
त्यानंतर त्यांनी जवळच्या इतर दुकानदार आणि फेरीवाल्यांकडे चौकशी केली, परंतु त्यांना आढळले की त्यांच्यापैकी अनेकांचे QR कोड बदलले आहेत. खार परिसरात असे जवळपास १० ते १२ प्रकरणं नोंदवली गेली आहेत . संबंधित दुकानदारांनी खार पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत एफआयआर नोंदवला आणि तांत्रिक देखरेख सुरू केली. कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) आणि इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंगचा वापर करून त्यांनी आरोपी शिव ओम दुबे (२२) याचा शोध सुरू केला.
आरोपी मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. तो मागील काही महिन्यांपासून कुलाबाच्या मच्छिमार नगरमध्ये वास्तव्यास होता. पोलिसांनी आरोपीला शोधले. ठोस पुराव्यांच्याआधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली.
चौकशीदरम्यान दुबेने घोटाळ्याची कबुली दिली. त्याने सांगितले केले की त्याची तीन बँकांमध्ये खाती आहेत. प्रत्येक बँक खाते UPI-सक्षम QR कोडशी जोडलेले आहे. तो हे QR कोड छापून पान शॉप, फेरीवाल्यांचे स्टॉल आणि इतर लहान व्यवसायांबाहेर असलेल्या क्यूआरवर चिकटवत असे. ज्यामुळे ग्राहकांनी केलेले पेमेंट थेट त्याच्या खात्यात जमा होत असे .
पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत आणि त्याच्या तिन्ही बँक खात्यांची देखील तपासणी करत आहे . मुंबईतील इतर ठिकाणी असा घोटाळा झाला आहे का याची देखील चौकशी सुरू आहे .