मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेच्या पश्चिम, मध्य (मुख्य मार्ग) आणि हार्बर या मार्गांवर रविवार २० जुलै २०२५ रोजी देखभाल दुरुस्ती कामांसाठी मेगाब्लॉग आहे. प्रवाशांनी मेगाब्लॉक काळात प्रवास टाळावा अथवा रविवारच्या वेळापत्रकाची माहिती घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मेगाब्लॉक आहे. मेगाब्लॉक काळात बोरिवली ते गोरेगाव दरम्यान जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या जलद मार्गावर वळवल्या जातील. काही गाड्या रद्द केल्या जातील. काही गाड्या २० मिनिटे उशिराने धावतील. ब्लॉककाळात बोरिवलीतील फलाट क्र. एक, दोन, तीन, चार यांवरून कोणतीही लोकल चालवण्यात येणार नाही.
हार्बर रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते चुनाभट्टी / वांद्रे दरम्यान जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावर सकाळी ११.४० ते संध्यकाळी ४.४० या वेळेत मेगाब्लॉक आहे. मेगाब्लॉक काळात सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल आणि सीएसएमटी ते वांद्रे/ गोरेगाव दरम्यान अप आणि डाउन धीम्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. पनवेल ते कुर्ला दरम्यान कुर्ला फलाट क्र. आठ वरून विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार दरम्यान जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ या वेळेत मेगाब्लॉक आहे. मेगाब्लॉक काळात सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवल्या जातील. काही गाड्या रद्द केल्या जातील. काही गाड्या २० मिनिटे उशिराने धावतील.
मुंबईतील सर्व लोकलला मेट्रोसारखे बंद दरवाजा असलेले वातानुकूलित (एसी) डबे द्यावेत, अशी मागणी केंद्राकडे केली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.