
मुंबई: राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यातील ३५७ पशुवैद्यकीय दवाखान्यांना लवकरच नवीन इमारती मिळणार आहेत. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत या प्रकल्पासाठी ४५८ कोटी ४१ लाख ३४ हजार रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. यात नवीन इमारतींचे बांधकाम, दुरुस्ती, स्वच्छतागृहे आणि उपकरणे खरेदीचा समावेश आहे.
पंकजा मुंडे यांनी पर्यावरण आणि पशुसंवर्धन विभागाची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पशुसंवर्धनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य बनवण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आता पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात येत आहे.
या निर्णयामुळे राज्यातील सात महसुली विभागांतील ३४ जिल्ह्यांमधील एकूण ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना नवसंजीवनी मिळणार आहे. नवीन इमारतींच्या बांधकामासाठी २८७ कोटी ७६ लाख ४४ हजार, दुरुस्तीसाठी १२१ कोटी ११ लाख ८२ हजार, स्वच्छतागृहांसाठी २५ कोटी १७ लाख २० हजार, आणि विविध उपकरणे खरेदीसाठी २४ कोटी ३५ लाख ८८ हजार रुपये असा एकूण ४५८ कोटी ४१ लाख ३४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. ही सर्व कामे सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्रस्तावित करण्यात येतील.
जिल्ह्यानिहाय तरतूद
बीड जिल्ह्यासाठी २४ इमारतींच्या बांधकामासाठी ९ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विभागनिहाय नवीन इमारतींची संख्या खालीलप्रमाणे आहे:
मुंबई विभाग (ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग): १३ ठिकाणी
पुणे विभाग (पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर): १२५ ठिकाणी
नाशिक विभाग (नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर): ५५ ठिकाणी
छत्रपती संभाजीनगर विभाग (छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड): ५१ ठिकाणी
लातूर विभाग (लातूर, नांदेड, धाराशिव, हिंगोली): ३९ ठिकाणी
अमरावती विभाग (अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ): ३८ ठिकाणी
नागपूर विभाग (नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली): ३६ ठिकाणी
या दूरगामी निर्णयामुळे राज्यातील पशुधनाच्या आरोग्याची अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाईल आणि पशुपालकांनाही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे.