लंडन : ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना होणार आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स या स्पर्धेत दोन्ही संघ एकमेकांसमोर येणार आहे.दोन्ही संघांमधील सामना २० जुलै रोजी होणार आहे. जिथे भारत आणि पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू एकमेकांसमोर येतील.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स ही स्पर्धा आजपासून म्हणजेच १८ जुलै रोजी सुरू होणार असून जिथे पहिला सामना इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मोठा सामना इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे होणार आहे. दोन्ही संघ २० जुलै रोजी एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंडवर एकमेकांसमोर येतील. युवराज सिंग, हरभजन सिंग, सुरेश रैना आणि इरफान पठाण सारखे दिग्गज खेळाडू इंडियन चॅम्पियन्स संघात खेळताना दिसतील. शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक आणि वहाब रियाझ सारखे दिग्गज खेळाडू पाकिस्तान संघात दिसू शकतात.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धेचा हा दुसरा हंगाम आहे. या दरम्यान इंग्लंड चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यात सामना होईल.या स्पर्धेत एकूण ६ संघ असतील, त्यापैकी टॉप-४ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. या स्पर्धेचा पहिला हंगाम भारतीय संघाने जिंकला होता. भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला.
भारतीय चॅम्पियन्स संघ २० जुलै रोजी पाकिस्तानविरुद्ध मोहिमेची सुरुवात करेल. त्यानंतर २२ जुलै रोजी त्यांचा सामना दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सशी होईल.
यानंतर, भारतीय संघ २६ जुलै रोजी ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सशी सामना करेल. भारतीय संघ २७ जुलै रोजी इंग्लंड चॅम्पियन्स आणि २९ जुलै रोजी वेस्ट इंडिज चॅम्पियन्सशी सामना करेल.