मुंबई: आयटीआय प्रवेश प्रक्रियेमध्ये दुहेरी लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेत २६० च्या प्रस्तावावर उत्तर देताना कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले की, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आय टी आय प्रवेश घेताना अनुसूचित जाती आणि अल्पसंख्याक दोन्ही सवलतींचा गैरफायदा घेतलेल्या विद्यार्थ्यांवर शासनाद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. खोट्या मार्गाने मिळवलेले फायदे थांबवून प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत स्पष्ट केले होते की, अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ केवळ हिंदू, बौद्ध आणि शीख समाजातील नागरिकांनाच मर्यादित आहे. इतर धर्मांतील काहींनी जर अशी जात प्रमाणपत्रे वापरून हा लाभ घेतला असेल, तर त्यांच्या प्रमाणपत्रांची वैधता रद्द करण्यात येईल, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. ITI मध्ये बनावट प्रमाणपत्रांवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांविरोधात होणारी कारवाईही महत्त्वाची ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आयटीआय अद्ययावत करण्यासाठी पी पी पी मॉडेल अमलात आणण्याचा क्रांतिकारी निर्णय आमच्या विभागाने घेतला. याद्वारे आयटीआयमध्ये पायाभूत सुधारणा, नवीन सुविधा, तंत्रज्ञान आणि विकासासाठी आवश्यक पाठबळ पुरवले जाईल. इतकेच नाही तर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, नवीन अभ्यासक्रम, रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी सहकार्य उपलब्ध होईल. आयटीआयमधील कोर्सेसला डिप्लोमा दर्जाची मान्यता मिळावी यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील आहोत,असेही मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.