मुंबई : काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'परिणती'- बदल स्वतःसाठी' या मराठी चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. मराठी चित्रपटसृष्टीतील दोन ताकदवान अभिनेत्री अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी यांना एकत्र पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच, नुकताच प्रदर्शित झालेला या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भावविश्वाला स्पर्श करणारा आहे.
चित्रपटाच्या नावावरून आणि पोस्टरमधूनच हा एक स्त्रीप्रधान चित्रपट असल्याचे स्पष्ट होते. ही कथा दोन वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या स्त्रियांच्या अनपेक्षित भेटीची, वाढत चाललेल्या मैत्रीची आणि संघर्षातून सशक्तपणे उभ्या राहिलेल्या त्यांच्या आयुष्याची आहे.
ट्रेलरमध्ये अमृता सुभाष एका डॉक्टरच्या भूमिकेत दिसत असून, ती आपल्या नवऱ्यासोबत आणि मुलासोबत एक सुखी कुटुंब जगत आहे. मात्र, अचानक तिच्या आयुष्यात काहीतरी गंभीर घडते, ज्यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचलेली दिसते. याचवेळी सोनाली कुलकर्णी, जी एका बार डान्सरची भूमिका साकारत आहे, ती अमृताला आधार देण्यासाठी पुढे येते. सोनालीचा सकारात्मक दृष्टिकोन आणि तिच्या स्वाभाविक सहानुभूतीमुळे, दोघींमध्ये एक हळुवार आणि घनिष्ट मैत्री निर्माण होत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसते.
चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक अक्षय बाळसराफ म्हणतात, "'परिणती' ही दोन स्त्रियांची गोष्ट आहे, परंतु त्याहूनही अधिक ती त्यांच्या अस्तित्वाच्या शोधाची कहाणी आहे. वेगळ्या पार्श्वभूमीच्या, स्वभावाच्या या दोन पात्रांच्या भेटीतून निर्माण होणारी मैत्री ही केवळ भावनिक आधार नसून, ती परस्परांची नवी ओळख घडवणारी शक्ती आहे. 'परिणती' मला वाटतं, प्रत्येकासाठी एक आरसा आहे, जो आपल्याला दाखवतो की, परिस्थिती काहीही असो, स्वतःवर विश्वास असेल तर आपण पुन्हा उभं राहू शकतो."
पीएच फिल्म्स, फिनिक्स फिल्म्स आणि इनसिंक मोशन पिक्चर्स प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते पराग मेहता आणि हर्ष नरूला आहेत. अमित डोगरा, मोना नरूला, आशिष त्रिवेदी, शारदा नरूला, मनोज जैन, मोहित लालवानी, कांचन शाह आणि शांता जैन यांनी सहनिर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. अक्षय बाळसराफ लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी आणि अक्षर कोठारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणारा 'परिणती - बदल स्वतःसाठी' हा चित्रपट एक भावनिक अनुभव देणारा आणि प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा ठरणार आहे, याची झलक ट्रेलरमधून स्पष्टपणे दिसते. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच भावेल अशी अपेक्षा आहे.