मुंबई : उपनगरीय रेल्वेतून दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. हा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी महाराष्ट्र शासन, रेल्वे मंत्रालय आणि केंद्र सरकार परस्पर समन्वयातून एक मोठी योजना राबवण्याचे नियोजन करत आहे. या अंतर्गत मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी सर्व एसी डबे करण्याचे नियोजन आहे. एसी डबे करण्यासाठी सर्व डब्यांना बंद होणाऱ्या स्वयंचलित दरवाजांची व्यवस्था केली जाईल. यामुळे गर्दीच्या वेळी डब्यातून पडून प्रवाशांचा अपघात होण्याचे संकट टळण्यास मदत होईल. एसी डब्यांमुळे रेल्वे प्रवास सुरक्षित आणि सुखकर होणार आहे; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देत होते. तिकिटात वाढ न करता ही सोय देण्यासाठी काय करता येईल याचाही विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. रेल्वेमंत्र्यांनी या विषयात सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली.
विरार ते कुलाबा एक सेतू तयार करण्याचे काम सुरू आहे. वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूमुळे प्रवास दहा मिनिटांत शक्य आहे. विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी भूसंपादन सुरू आहे. महामुंबईत १४ मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू आहे. मेट्रो, मोनो, रेल्वे, महामुंबईतील सर्व बस सेवा या सगळ्यांसाठी एकात्मिक तिकिटाच्या व्यवस्थेवर काम सुरू आहे. हे तिकीट व्हॉट्सअॅपवर मिळेल. प्रवाशांना आरामात, सुरक्षित आणि सुखकर प्रवास करता येईल. प्रवासाचा वेग वाढेल. यामुळे वेळ, इंधन आणि इंधनावरील खर्च यात बचत होईल. आधुनिक पायाभूत सुविधांमुळे नागरिकांना फायदा होणार आहे. या व्यवस्थेतूनच पुढे अर्थकारणाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी केला.