मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना २३ जुलैपासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात रंगत आहे. या सामन्यात स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार की नाही याबाबत भारतीय संघाचे सह प्रशिक्षख रयान टेन डोशेट यांनी मोठे विधान केले आहे. भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेत सध्या १-२ अशा पिछाडीवर आहे. अशातच टीम मॅनेजमेंटला वाटते की बुमराहने या महत्त्वाच्या सामन्यात खेळावे.
रयान टेन डोशेटने बॅकेनहम येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की जसप्रीत बुमराहबाबत आम्ही अंतिम निर्णय मँचेस्टरमध्ये घेऊ. मालिका सध्या निर्णायक वळणार आहे. यामुळे आम्ही त्याला खेळवण्याच्या विचारात आहोत. मात्र मोठे चित्र बघणेही गरजेचे आहे. मँचेस्टरमध्ये जिंकण्याची सगळ्यात मोठी शक्यता काय आहे. यानंतर ओव्हल कसोटीत आमची रणनीती काय असेल. यावर लक्ष द्यावे लागेल.
भारतीय संघाने लॉर्ड्स कसोटी सामन्यानंतर बॅकेनहेमच्या काऊंटी ग्राऊंडवर सराव सत्रात भाग घेतला. यानंतर संघ मँचेस्टरच्या दिशेने रवाना झाला. जसप्रीत बुमराहने लीड्स कसोटीत पहिल्या डावात ५ विकेट मिळवल्या होत्या. यानंतर त्याला एजबेस्टन सामन्यात आराम देण्यात आला होता. त्यानंतर तिसऱ्या कसोटीत बुमराहने पुन्हा चांगली कामगिरी केली आणि पहिल्या डावात पाच विकेट मिळवल्या. बुमराहने सध्याच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत चार डावात २८.०९च्या सरासरीने १२ विकेट घेतल्या आहेत.