नाशिक : खासगी वसतिगृहात नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवार १६ जुलै २०२५ रोजी घडली. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव ज्ञानेश्वरी संजय क्षीरसागर असे आहे. ती अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी होती आणि सरकारवाडा परिसरातील तिबेटियन मार्केटजवळील गौरव पार्क इमारतीत असलेल्या मुलींच्या खाजगी वसतिगृहात राहत होती.
दोन महिन्यांपूर्वी ज्ञानेश्वरी नीटच्या तयारीसाठी एका खासगी कोचिंग क्लासला उपस्थित राहण्यासाठी नाशिकला आली होती. ती ११ वीत विज्ञान विषय घेऊन शिकत होती. बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ती दुपट्टा वापरून पंख्याला लटकलेली आढळली. अन्य विद्यार्थिनींनी आणि वसतिगृह मालक यांनी तिला बेशुद्धावस्थेत जिल्हा रुग्णालयात नेले, यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून ज्ञानेश्वरीला मृत घोषित केले. तिच्या आत्महत्येमागील कारण समोर आलेले नाही. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद सरकारवाडा पोलिसांनी केली आहे. आत्महत्या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.