मुंबई : मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ओला उबेर चालकांचा संप सुरू आहे. ॲप कंपन्यांकडून शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे प्रतिकिमी भाडे वाढवून मिळावे, अशी या चालकांची मागणी आहे. तसेच रिक्षा आणि टॅक्सीप्रमाणे आमचे दरही निश्चित करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.त्यासाठी मंगळवार (दि.१५) पासून आझाद मैदानात ओला उबर टॅक्सी चालकांचे आंदोलन सुरु आहे.या संपाचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसत आहे.
ओला, उबर, रॅपिडोने आकारलेले मनमानी दर बंद करावेत. त्या ऐवजी सरकारी मीटर दर करावेत अशी मागणी या चालकांची आहे. शिवाय बाईक टॅक्सी कोणत्याही स्वरूपात मुंबई असू नये अशी त्यांची मागणी आहे.रिक्षा व कॅब परमिट वर मर्यादा आणली जावी. रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळ कार्यान्वित केले जावे. महाराष्ट्र गिग वर्कर्स ऍक्ट लागू करण्याचीही मागणी या संपाच्या माध्यमातून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात ओला, उबर आणि रॅपिडो कंपनीच्या शेकडो चालकांनी मंगळवार(दि.१५) पासून संप सुरू केला आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलक आक्रमक झाल्याचे चित्र आहे.
या आंदोलनातील एक मुख्य मुद्दा म्हणजे ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या अॅप-आधारित परिवहन कंपन्यांचे नियमन करण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारावी, ही मागणी आहे. परिवहन विभागाच्या अलीकडील एका पत्रानुसार, या कंपन्या निलंबनाच्या आदेशांनंतरही बेकायदेशीररीत्या दुचाकी टॅक्सी आणि बस चालवित आहेत. परिवहन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रॅपिडोची दुचाकी टॅक्सी सेवा थांबवण्यात आली आहे, मात्र अॅपवरील हालचाली आणि स्क्रीनशॉट दर्शवतात की ही सेवा अजूनही सुरू आहे.
आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, वारंवार नियमभंग करूनही या अॅप प्लॅटफॉर्म्सना कोणतीही शिक्षा होत नाही, मग ती सर्ज प्रायसिंग (दरवाढ), कामगारांचे शो
षण किंवा भारतीय परिवहन नियमांचे उल्लंघन असो. आंदोलनकर्त्यांनी यावेळी केंद्रीय परिवहन मंत्रालयावरही टीका केली आहे की, त्यांनी अॅप प्लॅटफॉर्मना दुहेरी भाडे आकारण्यास परवानगी दिली आहे. हे धोरण बेकायदेशीर सेवा पुरवणाऱ्यांना संरक्षण देणारे आहे आणि प्रवासी व चालक दोघांच्या हिताकडे दुर्लक्ष करणारे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.